लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : शुक्रवारी दुपारी शहडोल–नागपूर एक्सप्रेसचे चाक नैनपूर–केवलारी रेल्वे विभागात रुळावरून घसरल्याच्या घटनेने रेल्वे प्रशासनात प्रचंड खळबळ उडाली आहे. या घटनेची प्रशासनाकडून गंभीर दखल घेण्यात आली असून घटनेमागचे नेमके काय कारण आहे आणि त्याला कोण जबाबदार आहे, त्याची चाैकशी करण्याचे आदेश वरिष्ठ पातळीवरून जारी झाले आहे. या पार्श्वभूमीवर, आज दक्षिण पूर्व मध्य (दपूम) रेल्वेचे महाव्यवस्थापक तरुण प्रकाश यांच्यासह अवघे प्रशासनच त्या ट्रॅकवर उतरले. त्यांनी नागपूर विभागातील सिवनी–नैनपूर रेल्वे मार्गाची सूक्ष्म पाहणी केली. या पाहणीदरम्यान विविध अधिकाऱ्यांचा मोठा फाैजफाटा सोबत होता. त्यांनी सिवनी आणि नैनपूर स्थानक तसेच नैनपूर–केवलारी विभागातील रेल्वे मार्गाची संरचना, ट्रॅकची स्थिती आणि सुरक्षा व्यवस्थांचा सविस्तर आढावा घेतला. यावेळी ट्रॅकची गुणवत्ताही तपासण्यात आली. रेल्वे मार्गाच्या देखभाल-दुरुस्तीची कामे, पॉइंट व क्रॉसिंगची स्थिती, सिग्नल आणि दूरसंचार व्यवस्था, स्थानक परिसरातील व्यवस्था तसेच प्रवासी सुविधांचीही यावेळी तपासणी करण्यात आली. हे करतानाच अपघातानंतर संबंधित अधिकाऱ्यांकडून घटनेची कारणे जाणून घेण्यात आली. घटनेनंतर करण्यात आलेल्या सुधारात्मक उपायांचीही सविस्तर माहिती यावेळी महाव्यवस्थापकांनी घेतली.
बैठकीत सुरक्षेचे मंथन
या तपासणीनंतर महाव्यवस्थापक तरुण प्रकाश यांनी विभागीय व्यवस्थापक दीपक कुमार गुप्ता तसेच विभागातील ठिकठिकाणचे अभियांत्रिकी, वाणिज्य, संचालन, सिग्नल व दूरसंचार आदी विविध विभागांच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली. रेल्वे संचालन, सुरक्षा विषयक बाबी तसेच भविष्यात अशा घटना पुन्हा घडू नयेत यासाठी आवश्यक उपाययोजनांवर मंथन करण्यात आले. रेल्वे संरचनेच्या देखभालीत सर्वोच्च मानकांचे पालन करण्याचे निर्देश यावेळी तरुण प्रकाश यांनी संबंधितांना दिले.
तर, मोठा रेल्वे अपघात घडला असता
सूत्रांच्या मते, ट्रेनचा वेग कमी असल्यामुळे आणि वेळीच लोको पायलटने ट्रेन थांबविल्यामुळे मोठा अनर्थ टळला. ट्रेनचा वेग जास्त असता किंवा धक्का बसल्यानंतरही लोको पायलटने ट्रेन तशीच दाैडविली असती तर एक मोठा रेल्वे अपघात घडला असता. सुदैवाने तसे काही झाले नाही अन् कोणत्याही प्रवाशाला दुखापत झाली नाही.
Web Summary : The Shahdol-Nagpur Express derailed near Nainpur, causing alarm. Senior officials launched an inquiry and inspected the Nagpur division's rail line, focusing on track condition and safety measures. A major accident was averted due to the train's low speed and the driver's quick response. Safety meetings were held to prevent future incidents.
Web Summary : नैैनपुर के पास शहडोल-नागपुर एक्सप्रेस पटरी से उतरी, जिससे हड़कंप मच गया। वरिष्ठ अधिकारियों ने जांच शुरू की और नागपुर मंडल की रेल लाइन का निरीक्षण किया, जिसमें ट्रैक की स्थिति और सुरक्षा उपायों पर ध्यान केंद्रित किया गया। ट्रेन की कम गति और चालक की त्वरित प्रतिक्रिया से एक बड़ा हादसा टल गया। भविष्य में घटनाओं को रोकने के लिए सुरक्षा बैठकें हुईं।