भिवापुरात सात दिवस कडक लाॅकडाऊन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 18, 2021 04:08 IST2021-04-18T04:08:16+5:302021-04-18T04:08:16+5:30
लाेकमत न्यूज नेटवर्क भिवापूर : शहर व तालुक्यात काेराेनाबाधितांची संख्या झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे सात दिवस शहरात कडक लाॅकडाऊन ...

भिवापुरात सात दिवस कडक लाॅकडाऊन
लाेकमत न्यूज नेटवर्क
भिवापूर : शहर व तालुक्यात काेराेनाबाधितांची संख्या झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे सात दिवस शहरात कडक लाॅकडाऊन लावण्यात यावा, अशी मागणी सर्वपक्षीय पदाधिकारी व व्यापारी संघाने केली हाेती. याची दखल घेत तहसीलदार अनिरुद्ध कांबळे यांच्या सूचनेनुसार नगर पंचायत प्रशासनाने १९ ते २५ एप्रिलपर्यंत शहरात कडक लाॅकडाऊनचे आदेश जारी केले आहे. यात दवाखाने, मेडिकल स्टाेअर्स व फळ विक्रेत्यांना मुभा देण्यात आली आहे.
राज्य शासनाने संचारबंदी व जमावबंदी सुरू केली असली तरी, यात अत्यावश्यक सेवेच्या नावाखाली अनेक दुकाने बेधडक सुरू आहेत. शिवाय, किराणा, भाजी विक्रेता, मांस विक्रीच्या दुकानात गर्दी हाेऊन शासनाच्या नियमावलीला तिलांजली मिळत आहे. दुसरीकडे शहरासह तालुक्यात काेराेनाबाधित रुग्णांची संख्या वाढत आहे. काेराेनावर नियंत्रण मिळविण्यासाठी शहरात सात दिवसांचा कडक लाॅकडाऊन सुरू करावा, असा सूर नागरिकांनी व्यक्त केला हाेता.
दरम्यान, व्यापारी संघाचे अध्यक्ष अनिल समर्थ, आनंद गुप्ता, विवेक ठाकरे, विजय हेडाऊ, दिलीप गुप्ता, विनाेद तिजारे, तुषार चिचमलकर, आकाश हटवार यांच्या शिष्टमंडळाने शनिवारी (दि. १७) तहसीलदार अनिरुद्ध कांबळे यांची भेट घेत, शहरात लाॅकडाऊन लावण्याबाबत चर्चा केली. आपत्ती व्यवस्थापनाच्या दृष्टीने ही भूमिका लाेकहिताची असल्याने तहसीलदार कांबळे यांनी याबाबत नगर पंचायत प्रशासनाला लाॅकडाऊनबाबत आवश्यक सूचना दिल्या. त्यानुसार नगर पंचायत प्रशासनाने आदेश काढून १९ ते २५ एप्रिलपर्यंत कडक लाॅकडाऊनचा निर्णय घेतला व अंमलबजावणीबाबत सूचनाही दिल्या आहेत. लाॅकडाऊनदरम्यान केवळ दवाखाने, मेडिकल व फळ विक्रेत्यांची दुकाने सुरू असणार आहे.