‘सेतू’चे काम ठप्प
By Admin | Updated: August 6, 2014 01:16 IST2014-08-06T01:16:35+5:302014-08-06T01:16:35+5:30
महसूल कर्मचाऱ्यांच्या संपात नायब तहसीलदार आणि तहसीलदार सहभागी झाल्याने पाचव्या दिवशी महसूल खात्याचे कामकाज पूर्णपणे ठप्प पडले. सेतू केंद्र दुपारीच बंद करण्यात आले

‘सेतू’चे काम ठप्प
संपाचा फटका : अधिकारी हतबल, कंत्राटी कर्मचाऱ्यांवर भार
नागपूर : महसूल कर्मचाऱ्यांच्या संपात नायब तहसीलदार आणि तहसीलदार सहभागी झाल्याने पाचव्या दिवशी महसूल खात्याचे कामकाज पूर्णपणे ठप्प पडले. सेतू केंद्र दुपारीच बंद करण्यात आले तर विभागीय आयुक्त कार्यालयात सकाळी व्हिडिओ कॉन्फरन्सच्या वेळी अधिकाऱ्यांची चांगलीच तारांबळ उडाली.
गत चार दिवसांच्या तुलनेत मंगळवारी म्हणजे संपाच्या पाचव्या दिवशी जिल्हाधिकारी कार्यालय आणि विभागीय आयुक्त कार्यालयातील कामकाजावर संपाचा अधिक परिणाम दिसून आला. केवळ कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या मदतीने महत्त्वाचे काम हातावेगळे करण्याचे प्रयत्न अधिकारी करताना दिसले. महसूल प्रशासनात निर्णायक भूमिका बजावणारे नायब तहसीलदार आणि तहसीलदार संपात सहभागी झाल्याने प्रशासन संपूर्णपणे पंगू झाले आहे. सेतू केंद्रातील अर्जाची तपासणी करणारेच नसल्याने दुपारीच केंद्र बंद करण्यात आले. त्यामुळे अनेकांना परत जावे लागले.
दर आठवड्याला मुख्य सचिव व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून विभागीय आयुक्तांकडून पावसाची माहिती घेतात. सध्या पूर्व विदर्भातील काही जिल्ह्यात पावसाचा जोर आहे. मात्र महसूल कर्मचारी संपावर असल्याने आवश्यक ती माहितीच विभागीय आयुक्त कार्यालयात पोहोचत नाही. त्यामुळे मंगळवारी व्हिडिओ कॉन्फरन्सच्या वेळी अधिकाऱ्यांची चांगलीच तारांबळ उडाली.
कार्यालयातील कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून प्रशासनाचा गाडा हाकण्यात येत आहे. कार्यालयात शुकशुकाट आहे. पुढे जो दिसेल त्या कर्मचाऱ्यांना बोलावून कामे केली जात आहे. (प्रतिनिधी)