नागपूर सत्र न्यायालय : यो यो हनीसिंगला थायलंडला जाण्याची परवानगी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 23, 2019 20:27 IST2019-01-23T20:25:36+5:302019-01-23T20:27:18+5:30

सत्र न्यायालयाने बुधवारी पंजाबी रॅप गायक यो यो हनीसिंग याला सध्या केवळ थायलंड दौऱ्यावर जाण्याची परवानगी दिली. त्यामुळे त्याला अल्प दिलासा मिळाला. त्याला दुबई व ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावरही जायचे असून, ही मागणी न्यायालयाने प्रलंबित ठेवली.

Session Court of Nagpur: Yo Yo Honey Singh is allowed to go to Thailand | नागपूर सत्र न्यायालय : यो यो हनीसिंगला थायलंडला जाण्याची परवानगी

नागपूर सत्र न्यायालय : यो यो हनीसिंगला थायलंडला जाण्याची परवानगी

ठळक मुद्देअटींचे पालन करण्याचा आदेश

लोकमत न्यूज नेटवर्क 
नागपूर : सत्र न्यायालयाने बुधवारी पंजाबी रॅप गायक यो यो हनीसिंग याला सध्या केवळ थायलंड दौऱ्यावर जाण्याची परवानगी दिली. त्यामुळे त्याला अल्प दिलासा मिळाला. त्याला दुबई व ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावरही जायचे असून, ही मागणी न्यायालयाने प्रलंबित ठेवली.
हनीसिंगवर अश्लील गाणी गाण्याचा आरोप आहे. यासंदर्भात व्यावसायिक आनंदपालसिंग जब्बल यांनी केलेल्या तक्रारीवरून पाचपावली पोलिसांनी २६ एप्रिल २०१४ रोजी हनीसिंगविरुद्ध भादंविच्या कलम २९२, २९३ व माहिती तंत्रज्ञान कायद्याच्या कलम ६७, ६७-अ अन्वये एफआयआर नोंदवला आहे. या प्रकरणात सत्र न्यायालयाने २७ आॅक्टोबर २०१५ रोजी हनीसिंगला अटकपूर्व जामीन मंजूर करताना पूर्वपरवानगीशिवाय देशाबाहेर जाण्यास मनाई केली आहे तसेच विविध अटी निश्चित करून दिल्या आहेत. त्यामुळे हनीसिंगने वरील तीन देशांत जाण्याची परवानगी मिळविण्यासाठी सत्र न्यायालयात अर्ज दाखल केला होता.
अर्जावर न्यायाधीश पी. एफ. सय्यद यांच्यासमक्ष सुनावणी झाली. न्यायालयाने विविध बाबी लक्षात घेता, हनीसिंगला सध्या केवळ थायलंडला जाण्याची परवानगी दिली. तसेच, थायलंडमधील वास्तव्यादरम्यान संबंधित अटींचे काटेकोर पालन करण्याचा व थायलंड दौऱ्याच्या कार्यक्रमाची संपूर्ण माहिती पाचपावली पोलीस ठाण्यात सादर करण्याचा आदेश दिला. न्यायालयाने हनीसिंगचा २४ जानेवारी ते ५ फेब्रुवारी २०१९ पर्यंतचा थायलंड दौरा मंजूर केला आहे. तो थायलंडवरून भारतात परत आल्याची माहिती ६ फेब्रुवारी रोजी न्यायालयाला कळविण्यास सांगण्यात आले आहे. तसेच, दुबई व ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर सरकारला उत्तर दाखल करण्याचे निर्देश देण्यात आले आहे. यापूर्वी हनीसिंगला बँकॉक, दुबई, लंडन व हवाना येथे जाण्याची परवानगी देण्यात आली होती. हनीसिंगतर्फे अ‍ॅड. अतुल पांडे व अ‍ॅड. आशिष किल्लेदार, तक्रारकर्ते जब्बल यांच्यातर्फे अ‍ॅड. रसपालसिंग रेणू तर, सरकारतर्फे अ‍ॅड. नितीन तेलगोटे यांनी कामकाज पाहिले.

Web Title: Session Court of Nagpur: Yo Yo Honey Singh is allowed to go to Thailand