आता वेगळ्या विदर्भाची त्सुनामी
By Admin | Updated: June 1, 2014 00:55 IST2014-06-01T00:55:56+5:302014-06-01T00:55:56+5:30
केंद्रात भाजपला जनेतेने एकहाती सत्ता दिली असून त्यांच्या जाहीरनाम्यानुसार लहान राज्यांची निर्मिती करणे अनिवार्य आहे. त्यामुळे आता वेगळ्या विदर्भाची त्सुनामी सुरु झाली असून प्रचार आणि प्रसारासाठी

आता वेगळ्या विदर्भाची त्सुनामी
पत्रपरिषद : वामनराव चटप यांचा एल्गार, आंदोलनाची रुपरेषा ठरली
अमरावती : केंद्रात भाजपला जनेतेने एकहाती सत्ता दिली असून त्यांच्या जाहीरनाम्यानुसार लहान राज्यांची निर्मिती करणे अनिवार्य आहे. त्यामुळे आता वेगळ्या विदर्भाची त्सुनामी सुरु झाली असून प्रचार आणि प्रसारासाठी आंदोलनाची रुपरेषा ठरविण्यात आाल्याची माहिती माजी आमदार वामनराव चटप यांनी येथे दिली.
विदर्भ राज्य आंदोलन समितीच्या अमरावती विभागाच्यावतीने शनिवारी येथे पदाधिकार्यांची बैठक पार पडली. या बैठकीनंतर पत्र परिषदेत बोलताना चटप यांनी वेगळ्या विदर्भ राज्याच्या मागणीची रुपरेषा विषद केली. विदर्भाच्या वाट्याला कुपोषण, सिंचनाचा अनुशेष, नक्षलवाद, बेरोजगारी, शेतकरी आत्महत्या आल्या आहेत. हे सर्व थांबवायचे असेल तर वेगळ्या विदर्भाशिवाय पर्याय नाही. छोटे राज्य निर्मितीमुळे चांगले प्रशासन हाताळले जाऊ शकते, असा दावा त्यांनी केला. शिवसेनेच्या मते मराठी भाषेचे दोन राज्य होऊ देणार नाही. या त्यांच्या धमक्यांना आता विदर्भातील जनता कदापिही खतपाणी घालणार नाही. कारण केंद्रात भाजपला बहुमत देण्यात विदर्भाचा मोठा वाटा आहे, असे ते म्हणाले. भाजपच्या जाहिरनाम्यात वेगळ्या विदर्भाचा मुद्दा आवर्जून घेण्यात आला आहे. भाजपने विधानसभा निवडणुकीपूर्वी वेगळ्या विदर्भ राज्याची घोषणा करुन दिलेले अभिवचन पाळावे, अशी मागणी त्यांनी केली. आंदोलनाच्या पहिल्या टप्प्यात ४ व ५ जून रोजी नागपूर व अमरावती येथे धरणे आंदोलन होणार आहे. या आंदोलनादरम्यान विभागीय आयुक्तांच्या माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना वेगळ्या विदर्भाच्या मागणीचे निवेदन पाठविले जाईल. आता वेगळ्या विदर्भाची लढाई सुरु झाली असून वेगळा विदर्भ घेतल्याशिवाय ती बंद होणार नाही, असा एल्गार वामनराव चटप यांनी पुकारला. पत्रपरिषदेला विक्रम बोके, श्रीनिवास खांदेवाले, जगदीश बोंडे, भावना वासनिक, नितीन मोहोड, चंद्रशेखर देशमुख, हरिभाऊ दातेराव, करुण केदार, प्रफुल्ल पाटील आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)