लोकमत न्यूज नेटवर्कउमरेड : दोन वेगवेगळ्या कुटुंबांतील मृतांच्या पार्थिवावर सोमवारी (दि. ३) अंत्यसंस्कार करण्यात आले. आज, मंगळवारी सकाळी ८ वाजण्याच्या सुमारास आप्तस्वकीय धार्मिक विधीसाठी 'राख आणि अस्थी' गोळा करण्यास स्मशानभूमी परिसरात पोहोचले. काल सर्वानी साश्रुनयनांनी निरोप दिला आणि मंगळवारी अवघ्या काही तासातच दोन्ही पार्थिवांची राख आणि अस्थी गायब झाली.
उमरेड येथील भिवापूर राष्ट्रीय महामार्गालगत असलेल्या स्मशानभूमीवर हा धक्कादायक विचित्र प्रकार उजेडात आला. राख आणि अस्थी गायब झालेल्या पार्थिवामध्ये एका २३ वर्षीय मृत तरुणीचा समावेश आहे, हे येथे उल्लेखनीय. साक्षी सुनील पाटील (वय २३, रा. बालाजी नगर, उमरेड) आणि नरेश दुर्योधन सेलोटे (४८, रा. परसोडी, उमरेड) अशी मृतांची नावे आहेत.
उमरेड येथील शेतकरी कुटुंबातील साक्षी पाटील हिचा हृदयविकाराने मृत्यू झाला. २३ वर्षीय तरुणीवर ओढवलेल्या मृत्यूपश्चात समाजमन हळहळले. तिच्या पार्थिवावर सोमवारी दुपारी एकच्या सुमारास भिवापूर मार्गावरील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. परसोडी येथील नरेश सेलोटे या मजुराचा २ नोव्हेंबरला आजारपणाने मृत्यू झाला. त्यांच्या पार्थिवावरसुद्धा याच स्मशानभूमीत दुपारी एकच्या सुमारास अंत्यविधी पार पडला.
अंत्यसंस्कार आटोपल्यानंतर आप्तस्वकीय परतले. शिवाय सोमवारी (दि. ३) सायंकाळी ७.३० वाजता साक्षी पाटील यांच्याकडील नातेवाइकांनी स्मशानभूमी गाठले. त्यावेळपर्यंत पार्थिव जळत होते. मंगळवारी सकाळी ८:३० वाजण्याच्या सुमारास मृत नरेश सेलोटे यांच्याकडील कुटुंबीय स्मशानभूमीत राख आणि अस्थी गोळा करण्यासाठी पोहोचले. राख आणि अस्थी गायब असल्याचे चित्र दिसताच सर्वच अवाक् झाले. चौकशी करताच मृत साक्षी पाटील या तरुणीचीही राख आणि अस्थी गायब झाल्याची बाब उजेडात आली. लगेच पोलिस यंत्रणा, नगरपालिका प्रशासन स्मशानभूमी परिसरात दाखल झाली. दोन्ही पार्थिवाच्या राखेतून उरलेल्या हाडांचे एकही अवशेष स्मशानभूमीवर सापडले नाही. या विचित्र धक्कादायक प्रकारानंतर संतापजनक प्रतिक्रिया उमटत आहेत.
तांत्रिकांची रेकी?
५ नोव्हेंबर हा कार्तिक पौर्णिमेचा दिवस आहे. त्रिपुरारी पौर्णिमा या पार्श्वभूमीवर पार्थिवांची राख आणि अस्थी गायब करण्यात आली, असा अंदाज वर्तविला जात आहे. या सर्व प्रकारामागे गुप्तधनाचा संशयसुद्धा बळावला आहे. शिवाय, रेकी करणारी तांत्रिकांची गँग असावी, असाही कयास लावला जात आहे. रात्री १० ते मध्यरात्री २ वाजेदरम्यान या घडमोडी घडल्या असाव्यात, असा अंदाज प्राथमिक तपासणीअंती व्यक्त होत आहे.
गुन्हा दाखल, तपास सुरू
महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष अनिष्ट व अघोरी प्रथा व जादूटोणा यांना प्रतिबंध करण्याबाबत आणि त्याचे समूळ उच्चाटन करण्याबाबत २०१३ कायद्यान्वये उमरेड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पुढील तपास पोलिस निरीक्षक धनाजी जळक करीत आहेत. दरम्यान, घटनास्थळी श्वानपथकाला पाचारण करण्यात आले होते. तांत्रिक अडचणींमुळे श्वानपथकाची शोधमोहीम उपयोगी ठरली नाही.
Web Summary : In Nagpur, ashes vanished from a crematorium after two cremations, sparking fear. Police suspect black magic, investigating under anti-superstition laws. Locals urged vigilance.
Web Summary : नागपुर में दो दाह संस्कार के बाद श्मशान घाट से राख गायब होने से दहशत फैल गई। पुलिस को काला जादू का संदेह, अंधविश्वास विरोधी कानूनों के तहत जांच जारी, स्थानीय लोगों से सतर्कता का आग्रह किया गया।