नागपूर : ज्येष्ठ गांधीवादी कार्यकर्ते मोहन हिराबाई हिरालाल यांचे बुधवारी मध्यरात्री नागपूर येथे निधन झाले. मोहनभाई यांचे व्यक्तित्व आणि आणि त्यांचे आयुष्य हीच एक मोठी चळवळ किंवा संस्था होती. गांधी-विनोबांच्या विचारातील ‘ग्रामस्वराज्य’ ही त्यांच्या कामाची दिशा होती.
गडचिरोली जिल्ह्यातील लेखा-मेंढा गावातील ‘मावा नाटे मावा राज’ या चळवळीचे ते एक आधारस्तंभ होते. गांधी-विनोबांचे परिवर्तनाचे सिद्धांत केवळ प्रयोगात्मक नव्हते तर ते कसे व्यवहार्य असू शकतात, हे त्यांनी लेखा-मेंढाच्या चळवळीतून सिद्ध केले होते.
लेखा-मेंढा गावातील ग्रामसभेला त्यांच्या भोवतालच्या जंगलाचे वनहक्क मिळाले, त्या पाठीमागे मोहनभाईंनी सर्वोच्च न्यायालयापर्यंत तीस वर्षे लढा दिला, हे लक्षात ठेवले पाहिजे. गेल्या ऑगस्टमध्ये ‘दक्षिणायन’ नागपूरच्या वतीने ‘आणीबाणी’ वर एक चर्चात्मक कार्यक्रम ठेवला होता, त्यात ते सहभागी झाले होते.
तसेच ‘आदिवासी मराठी साहित्य’ या प्रमोद मुनघाटे संपादित पुस्तकाला त्यांनी लेखा-मेंढा गावातील ग्रामसभेच्या चळवळीवरील लेख दिला आहे. कोल्हापूरची भाषा विकास संशोधन संस्था ते प्रकाशित करीत आहे. पण, ते पुस्तक येण्यापूर्वीच मोहनभाईंचे निधन झाले.