शिवसेनेत लवकरच फेरबदल
By Admin | Updated: July 1, 2014 00:55 IST2014-07-01T00:55:54+5:302014-07-01T00:55:54+5:30
शिवसेनेचे पूर्व विदर्भ संपर्कप्रमुख बदलण्यात आले आहे. खा. विनायकराव राऊत यांच्या जागी आता आ.डॉ. दीपक सावंत हे पूर्व विदर्भाचा कारभार पाहणार आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार,

शिवसेनेत लवकरच फेरबदल
संपर्कप्रमुख बदलले : शहर व जिल्हा कार्यकारिणी नव्याने होणार
नागपूर : शिवसेनेचे पूर्व विदर्भ संपर्कप्रमुख बदलण्यात आले आहे. खा. विनायकराव राऊत यांच्या जागी आता आ.डॉ. दीपक सावंत हे पूर्व विदर्भाचा कारभार पाहणार आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर पक्षाची संघटनात्मक बांधणी अधिक मजबूत करण्यासाठी शहर व जिल्हा कार्यकारिणीतही फेरबदल केले जाणार आहे. हा बदल जुलैच्या पहिल्या वा दुसऱ्या आठवड्यात होईल.
विनायकराव राऊत यांनी लोकसभा निवडणुकीत नीलेश राणे यांचा पराभव केला. विधानसभा निवडणुकीतही शिवसेनेला कोकण काबीज करायचे आहे. अशा परिस्थितीत राऊत यांना कोकणात अधिक वेळ देता यावा यासाठी त्यांच्याकडून पूर्व विदर्भाची जबाबदारी काढून हिंगोली व नांदेडची जबाबदारी देण्यात आली आहे. लोकसभा निवडणुकीच्या काळात डॉ. दीपक सावंत हे नागपुरात तळ ठोकून होते. लोकसभा निवडणुकीत गडकरी-उद्धव वादामुळे दुखावलेल्या शिवसैनिकांची नाराजी दूर करण्यात डॉ. सावंत यांनी मोलाची भूमिका बजावली होती. गेल्या निवडणुकीत रामटेकमध्ये पराभव झाल्यानंतरही यावेळी तुमाने यांनाच संधी द्यावी, ते जिंकतील, असा आग्रह त्यांनी पक्षनेतृत्वाकडे धरला होता. आपला आग्रह कितपत बरोबर होता, हे निकाल पाहता सिद्ध झाले. त्यामुळे शिवसेनाप्रमुखांनी डॉ. दीपक सावंत यांच्याकडे पूर्व विदर्भाचे पालकत्व देण्याचा निर्णय घेतला. सावंत हे उद्धव ठाकरे यांचे अत्यंत विश्वासू आहेत.
विद्यमान जिल्हाध्यक्ष शेखर सावरबांधे हे विनायकराव राऊत यांचे खासमखास आहेत. सावरबांधे यांचे नाव दक्षिण नागपूरसाठी सुरू आहे. अशात संघटनेत फेरबदल करताना जिल्हाध्यक्षपद दुसऱ्या व्यक्तीकडे सोपविले जाऊ शकते. माजी उपमहापौर किशोर कुमेरिया, उपजिल्हा प्रमुख चंद्रहास राऊत व शहरप्रमुख मंगेश सरायकर यांचे नाव आघाडीवर आहे. सर्वांनी आपापल्या परीने फिल्डिंग लावण्यास सुरुवात केली आहे. नागपूर ग्रामीणमध्ये नरखेडचे सभापती राजू हरणे व पांडुरंग बुराडे हे दोन जिल्हाप्रमुख आहेत. ग्रामीणची कार्यकारिणी काही दिवसांपूर्वीच तयार करण्यात आल्यामुळे तिला सध्याच हात लावला जाणार नाही, असे सूत्रांचे म्हणणे आहे. काटोलमधून राजू हरणे यांना उमेदवारी मिळाली तर त्यांच्या जागी दुसरा जिल्हाध्यक्ष नेमला जाऊ शकतो. (प्रतिनिधी)