नागपूर : केंद्रातील मोदी सरकारने आपल्या पहिल्याच रेल्वे अर्थसंकल्पात नागपूरवर कृपादृष्टी दाखवून नागपूर-सिकंदराबाद, नागपूर-बिलासपूरसाठी सेमी हायस्पीड सेक्टर विकसित करण्याची घोषणा केली. या मार्गावर १६० ते २०० किलोमीटर प्रतितास वेगाने रेल्वेगाडी धावणार होती. प्रवाशीही कमीतकमी वेळात आपला प्रवास पार पाडणार होते. परंतु आठ महिने उलटूनही हा प्रकल्प केवळ कागदावरच राहिल्याची स्थिती आहे.केंद्र शासनाचा २६ फेब्रुवारी २०१५ रोजी सादर होणारा वर्ष २०१५-१६ च्या रेल्वे अर्थसंकल्पात सेमी हायस्पीड रेल्वेगाड्या चालविण्याविषयी काही ठोस घोषणा किंवा निधीची तरतूद होण्याची अपेक्षा आहे. तत्कालीन रेल्वेमंत्री सदानंद गौडा यांनी २०१४-१५ च्या रेल्वे अर्थसंकल्पात दिल्ली-आगरा, दिल्ली-कानपूर, दिल्ली-चंदीगड, चेन्नई-हैदराबाद, नागपूर-सिकंदराबाद, नागपूर-बिलासपूर, मुंबई-गोवा मार्गावर प्रतितास १६० ते २०० किलोमीटर वेगाने सेमी हायस्पीड रेल्वेगाड्या चालविण्याची घोषणा केली होती. मध्य रेल्वेच्या नागपूर विभागाने नागपूर-सिकंदराबाद विभागात नागपूर ते बल्लारशापर्यंत १६०-२०० किलोमीटरच्या आधी १३० किलोमीटर वेगाने रेल्वे चालविण्याचा निर्णय घेतला. परंतु त्यासाठी रेल्वे रुळ, सिग्नल आणि इतर कामासाठी निधीचा तुटवडा पडला. या कामासाठी ७० कोटी रुपयांच्या निधीची आवश्यकता आहे. १६० किलोमीटर वेगाने रेल्वे चालविण्यासाठी २५० कोटींची आवश्यकता आहे. रेल्वे प्रशासनाने याबाबत आवश्यक ते सर्वेक्षण करून त्याचा अहवाल मुख्यालयामार्फत रेल्वे बोर्डाला पाठविला आहे. नि२धीच्या कमतरतेमुळे नागपूर-सिकंदराबाद सेमी हायस्पीड रेल्वे कागदावरच धावत असल्याची स्थिती आहे. दक्षिण पूर्व मध्य रेल्वेच्या नागपूर विभागात नागपूर -बिलासपूर सेक्टरमध्ये नागपूर ते दुर्गपर्यंत आवश्यक सुधार कार्य केल्यानंतरच सेमी हायस्पीड रेल्वेगाड्या चालवू शकणार आहे. त्यासाठी जवळपास ५०० कोटी रुपयांची आवश्यकता भासणार आहे. विभागाने सर्वेक्षणाचा अहवाल रेल्वे बोर्डाला पाठविला आहे. आगामी रेल्वे अर्थसंकल्पात या दोन्ही विभागांच्या अहवालास मंजुरी मिळून आवश्यक निधीची तरतूद झाल्यानंतरच हे प्रकल्प मार्गी लागण्याची अपेक्षा वर्तवण्यात येत आहे. (प्रतिनिधी)
कागदावरच धावतेय ‘सेमी हायस्पीड ट्रेन’
By admin | Updated: February 19, 2015 02:07 IST