ज्ञानज्योतीसाठी जिल्ह्यातून चार शाळांची निवड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 04:56 IST2021-02-05T04:56:21+5:302021-02-05T04:56:21+5:30
ठाकरे : लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : महाराष्ट्र ग्राम सामाजिक परिवर्तन अभियान (व्हीएसटीएफ) अंतर्गत राज्यातील १०० आदर्श शाळांच्या निवडीसाठी ...

ज्ञानज्योतीसाठी जिल्ह्यातून चार शाळांची निवड
ठाकरे :
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : महाराष्ट्र ग्राम सामाजिक परिवर्तन अभियान (व्हीएसटीएफ) अंतर्गत राज्यातील १०० आदर्श शाळांच्या निवडीसाठी ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले गुणवत्तापूर्ण शिक्षण अभियान जिल्ह्यात राबविण्यात येत असून, त्यामध्ये जिल्ह्यातील चार शाळांची निवड करण्यात आली आहे. त्या शाळांचे राज्यस्तरासाठी प्रस्ताव पाठविण्याचे निर्देश जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांनी आज दिले.
जिल्ह्यात व्हीएसटीएफ- मिशन १०० आदर्श शाळा हे अभियान राबविण्यात आले असून, त्या अभियानाचा आढावा शुक्रवारी जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली छत्रपती सभागृहात आयोजित बैठकीत घेण्यात आला. त्यावेळी त्यांनी चार शाळांची निवड केली. यात पारशिवनी तालुक्यातील ढवळापूर येथील आदिवासी शाळा, भिवापूर तालुक्यातील मानोरा आणि रामटेक तालुक्यातील सावरा या बिगर आदिवासी तसेच कुही तालुक्यातील वग येथील शाळेचा समावेश आहे.
अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी कमलकिशोर फुटाणे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पंचायत) राजेंद्र भुयार, शिक्षणाधिकारी (प्राथमिक) चिंतामण वंजारी, गटविकास अधिकारी मनोजकुमार हिरुडकर, श्रीमती माणिक हिमाणे, पी.के. बमनोटे, सहायक गटविकास अधिकारी चंद्रकांत देशमुख, विस्तार अधिकारी रमेश चरडे, अभियानाच्या जिल्हा कार्यकारी किरण भोयर, तालुका समन्वयक रुपेश जवादे, कैलास लोखंडे, अविनाश मानकर, अंकित देशमुख उपस्थित होते.
पारशिवनी आणि रामटेक तसेच कुही आणि भिवापूर तालुक्यातील गटविकास अधिकाऱ्यांनी दुसऱ्या तालुक्यातील निवड झालेल्या शाळांना भेटी देऊन निकष पूर्ण केल्याची तपासणी करावी आणि तसा अहवाल सादर करावा, असे निर्देश जिल्हाधिकारी ठाकरे यांनी बैठकीत दिले.
या शाळांमध्ये भौतिक सुविधा, गुणवत्तापूर्ण शिक्षण, शाळा व्यवस्थापन समितीचे सक्षमीकरण, पर्यावरणस्नेही शाळा व आरोग्य आणि पोषण तसेच आनंददायी शिक्षण या निकषांचा समावेश आहे. राज्यस्तर ते शाळास्तरापर्यंतचे प्रत्यक्ष नियोजन, अंमलबजावणी व मूल्यमापन विविध उपक्रम राबविण्यासाठी २६ जानेवारी ते ३१ डिसेंबर २०२१ दरम्यान या अभियानात समाविष्ट उपक्रमांची अंमलबजावणी करण्यात येणार आहे. शाळांची पाहणी व मूल्यांकन, गावसभेचे आयोजन, आदर्श शाळा विकास आराखडा, आराखड्यास अंतिम मंजुरी देणे, १० मेंटार्सची निवड करणे आदी होत. हे निकष पूर्ण करणाऱ्या शाळांना ३ जानेवारी २०२२ रोजी सावित्रीबाई फुले जयंतीला आदर्श शाळा पुरस्कार वितरीत करण्यात येणार आहे.