सतीश उकेंची तीन एकर जमीन जप्त करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2017 01:28 IST2017-07-20T01:28:36+5:302017-07-20T01:28:36+5:30

वादग्रस्त वकील सतीश उके यांची दाभा येथे तीन एकर जमीन असल्याची माहिती शासनाने बुधवारी

Seize three acres of land of Satish Ukhane | सतीश उकेंची तीन एकर जमीन जप्त करा

सतीश उकेंची तीन एकर जमीन जप्त करा

हायकोर्टाचा आदेश : मालकीची शहानिशा करण्याची सूचना
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : वादग्रस्त वकील सतीश उके यांची दाभा येथे तीन एकर जमीन असल्याची माहिती शासनाने बुधवारी दिल्यानंतर मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने ही जमीन मालकीची शहानिशा करून तीन दिवसांत जप्त करण्याचा आदेश जिल्हाधिकाऱ्यांना दिला.
प्रकरणावर न्यायमूर्तीद्वय प्रसन्न वराळे व झेड. ए. हक यांच्या विशेष न्यायपीठासमक्ष सुनावणी झाली. दरम्यान, शासनाने वरील माहितीसह उके यांना शोधण्यासाठी आतापर्यंत केलेले प्रयत्न व पुढील रणनीती याबाबतचे दस्तावेजही सादर केले. २८ फेब्रुवारी २०१७ रोजी उच्च न्यायालयाने उके यांना न्यायालयाच्या अवमानना प्रकरणात दोन महिने साधा कारावास व दोन हजार रुपये दंड आणि दंड न भरल्यास १५ दिवस अतिरिक्त साधा करावास, अशी शिक्षा सुनावली. परंतु, उके त्यापूर्वीपासूनच अज्ञात ठिकाणी लपून बसले आहेत. त्यामुळे या निर्णयाची अद्याप अंमलबजावणी होऊ शकली नाही. उके यांना पकडून गजाआड करण्यासाठी वॉरंट जारी करण्यात आला आहे. याप्रकरणावर आता १० आॅगस्ट रोजी पुढील सुनावणी होईल. शासनातर्फे अ‍ॅड. केतकी जोशी यांनी बाजू मांडली.

काकड यांच्याविरुद्धची नोटीस मागे
मुंबई येथील नोटरी अ‍ॅड. आर. एस. काकड यांनी उके यांचे दोन अर्ज अधिकृत केले होते. न्यायालयाने त्यावर आक्षेप घेऊन काकड यांना कारणे दाखवा नोटीस बजावली होती. काकड यांनी बुधवारी प्रतिज्ञापत्र सादर करून न्यायालयाची बिनशर्त क्षमा मागितली. त्यामुळे न्यायालयाने कारणे दाखवा नोटीस मागे घेतली. तसेच, अर्ज अधिकृत करून घेताना उके यांनी शिक्षेची माहिती लपवून ठेवल्यामुळे त्यांच्याविरुद्ध कायद्यानुसार कारवाई करण्याची काकड यांना मुभा दिली.

Web Title: Seize three acres of land of Satish Ukhane

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.