गडकिल्यांसह कोकण किनारपट्टीवरील सुरक्षेला प्राधान्य, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ग्वाही
By महेश विद्यानंद सरनाईक | Updated: December 19, 2024 19:33 IST2024-12-19T19:33:08+5:302024-12-19T19:33:55+5:30
नीलेश राणेंच्या मागणीची दखल

गडकिल्यांसह कोकण किनारपट्टीवरील सुरक्षेला प्राधान्य, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ग्वाही
नागपूर : संपूर्ण कोकण किनारपट्टीवर असलेल्या गडकिल्ल्यांचे ऑडिट झाले पाहिजे. तसेच समुद्री मार्गाने होत असलेल्या प्रत्येक हालचालींवर लक्ष असले पाहिजे. यासाठी शासनाने आवश्यक धोरण आखावे अशी मागणी कुडाळ मतदारसंघाचे नवनिर्वाचित आमदार निलेश राणे यांनी राज्यपालांच्या अभिभाषणावर चर्चा करताना विधानसभेत मंगळवारी केली होती.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याची दखल घेऊन याबाबत आवश्यक ती सुरक्षितता लक्षात घेऊन निर्णय घेण्यात येईल असे आश्वासन गुरुवारी विधानसभेत दिले.
आमदार निलेश राणे यांनी संपूर्ण कोकण किनारपट्टीवर असलेल्या गडकिल्ल्यांचे ऑडिट होणे आवश्यक असल्याचे मत मंगळवारी मांडले होते. तसेच मुंबई झालेल्या दहशतवादी हल्ल्यातील आरोपींनी समुद्री मार्गेच येणे पसंत केले होते. त्यामुळे याबाबत आवश्यक ती खबरदारी घेण्यासाठी किनारपट्टीवर शासनाने योग्य उपाययोजना कराव्यात याकडे लक्ष वेधले होते.
तसेच समुद्रातील व कोकण किनारपट्टीवरील गडकिल्ल्यांचे शासनाने ऑडिट करावे अशी मागणी केली होती. सुरक्षितेच्या दृष्टीने या मागणीची दखल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी आपल्या भाषणात घेतली. गडकिल्ल्यांप्रमाणेच कोकण किनारपट्टीवरील ७०० पेक्षा जास्त लँडिंग पॉईंटवर लक्ष ठेवण्याच्या दृष्टीने निर्णय घेण्यात येईल असे आश्वासन फडणवीस यांनी दिले आहे.