सुरक्षा रक्षक मंडळाचे धनादेश चोरीला
By Admin | Updated: October 8, 2015 03:05 IST2015-10-08T03:05:37+5:302015-10-08T03:05:37+5:30
नागपूर जिल्हा सुरक्षा मंडळाच्या कार्यालयातून स्वाक्षरी केलेले कोरे धनादेश चोरी करण्यात आले.

सुरक्षा रक्षक मंडळाचे धनादेश चोरीला
बँकेत धनादेश वठविण्याचा प्रयत्न : तक्रारीनंतरही सीताबर्डी पोलिसांकडून चौकशी नाही
नागपूर : नागपूर जिल्हा सुरक्षा मंडळाच्या कार्यालयातून स्वाक्षरी केलेले कोरे धनादेश चोरी करण्यात आले. संबंधित धनादेशापैकी एका धनादेशावर १७ लाख रुपये लिहून तो वटविण्याचा प्रयत्नही करण्यात आला.
मात्र, देना बँकेतील जागरूक कर्मचाऱ्यामुळे हा प्रकार उघडकीस येऊन मंडळाचे लाखो रुपये वाचले. याबाबत मंडळाच्या सचिवांनी सीताबर्डी पोलिसात तक्रार देऊन दोन आठवडे होऊनही सीताबर्डी पोलिसांनी मंडळाच्या कार्यालयात किंवा बँकेत जाऊन साधी चौकशीही केली नाही. या प्रकरणाची चौकशी सोपविण्यात आलेले पोलीस उपनिरीक्षक रजेवर असल्याचे कारण सीताबर्डी पोलीस समोर करीत आहेत.
लाखो रुपयांची अफरातफर करण्याचा प्रयत्न झालेल्या या प्रकरणाच्या चौकशीत सीताबर्डी पोलिसांनी एवढी उदासीन भूमिका का दाखविली याबद्दल प्रश्न उपस्थित केले जात आहे. नागपूर जिल्हा सुरक्षा मंडळाच्या कार्यालयातून स्वाक्षरी केलेले काही धनादेश चोरीला गेले. मात्र, मंडळातील कर्मचाऱ्यांना याची माहिती नव्हती. २३ सप्टेंबर २०१५ रोजी देना बँक, खापरखेडा या शाखेचा ११८२१२ या क्रमांकाचा १७ लाख १४ हजार रुपयांचा धनादेश राहुल नत्थुजी बन यांच्या नावाने बँक आॅफ इंडियाच्या वैशाली नगर शाखेत जमा करण्यात आला.
संबंधित धनादेश क्लिअरिंंगसाठी देना बँकेच्या इतवारी येथील शाखेत आला. धनादेशावरील रक्कम मोठी असल्यामुळे देना बँकेतील महिला कर्मचाऱ्याने नागपूर जिल्हा सुरक्षा रक्षक मंडळाच्या कार्यालयात फोन केला व संबंधित धनादेश वटविण्यासाठी सादर करण्यात आला आहे का, अशी विचारणा केली. यावर मंडळाकडून असा कुठलाही धनादेश कुणालाही देण्यात आला नसल्याचे सांगितले व संबंधित धनादेश वटवू नका, अशा सूचना दिल्या. त्यामुळे बँकेने धनादेश वटविला नाही.
बँकेतून आलेल्या फोन नंतर मंडळातील अधिकारी सावध झाले. त्यांनी कार्यालयात उपलब्ध असलेल्या धनादेशांची तपासणी केली असता स्वाक्षरी करून ठेवलेले काही धनादेश गहाळ झाले असल्याचे आढळून आले.
राहुल बन यांच्याकडे धनादेश गेला कसा ?
मंडळाच्या देना बँकेच्या धनादेशावर १७ लाख १४ हजार रुपये एवढी रक्कम लिहून तो राहुल नत्थुजी बन यांच्या नावाने बँक आॅफ इंडियाच्या वैशालीनगर शाखेत जमा करण्यासाठी सादर करण्यात आला. बन यांचे खाते क्रमांक ८७७६१०११०००१२१४ असे आहे. पोलिसांनी वेळीच दखल घेऊन बँक आॅफ इंडियात चौकशी केली तर बन यांचा पत्ता मिळू शकतो. बन यांची चौकशी केली तर त्यांच्याकडे मंडळाचा धनादेश कुठून आला, त्यांना कुणी दिला व त्यांनी तो वटविण्यासाठी कसा काय सादर केला, या प्रश्नांची उत्तरे मिळून मोठा भंडाफोड होऊ शकतो. मात्र, यासाठी पोलिसांनी तत्परता दाखविणे अपेक्षित आहे.
मंडळ करणार
मुख्यमंत्र्यांकडे तक्रार
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नागपुरातील पोलीस आर्थिक गुन्ह्याच्या तपासाबाबत एवढे उदासीन असतील तर गुन्हेगारांचे मनसुबे आणखी वाढतील. नागपूर जिल्हा सुरक्षा मंडळ हे शासनाचे मंडळ आहे. शासकीय निधीचा अपहार करण्याचा प्रयत्न झालेल्या या प्रकरणात तक्रार देऊनही सीताबर्डी पोलिसांनी चौकशीत दिरंगाई केली. याबाबतची तक्रार मंडळातर्फे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली जाणार आहे.