रेल्वे संघटनांचे पोस्टर हटविल्यामुळे हंगामा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 04:55 IST2021-02-05T04:55:14+5:302021-02-05T04:55:14+5:30
नागपूर : मध्य रेल्वेच्या नागपूर विभागात विभागीय रेल्वे कार्यालयात सोमवारी सकाळी युनियनचे अनधिकृत पोस्टर हटविल्यामुळे सकाळपासून सायंकाळपर्यंत हंगामा करण्यात ...

रेल्वे संघटनांचे पोस्टर हटविल्यामुळे हंगामा
नागपूर : मध्य रेल्वेच्या नागपूर विभागात विभागीय रेल्वे कार्यालयात सोमवारी सकाळी युनियनचे अनधिकृत पोस्टर हटविल्यामुळे सकाळपासून सायंकाळपर्यंत हंगामा करण्यात आला. सेंट्रल रेल्वे मजदूर संघ आणि नॅशनल रेल्वे मजदूर युनियनने विरोध केल्यामुळे आरपीएफचे ४० जवान तैनात करण्यात आले. दरम्यान, दोन्ही युनियनच्या वतीने नारेबाजी करण्यात आली.
‘डीआरएम’ कार्यालयाच्या व्यवस्थापनाने विविध रेल्वे युनियनला परिसरात पोस्टर लावण्यासाठी जागा आणि आकार ठरविला आहे; परंतु युनियन निर्धारित जागेपेक्षा अधिक जागेत पोस्टर लावतात. दिवाळी संपल्यानंतर अजूनही युनियनचे पोस्टर परिसरात लागलेले आहेत. यामुळे परिसरातील सुंदरतेवर प्रभाव पडतो. यामुळे अप्पर विभागीय रेल्वे व्यवस्थापकांनी आरपीएफला अवैध आणि अधिक जागेत लावलेले पोस्टर हटविण्याचे निर्देश दिले. आदेश मिळताच आरपीएफने पोस्टर हटविण्याची कारवाई सुरू केली. त्यावर युनियनच्या पदाधिकाऱ्यांनी हंगामा सुरू केला. आरपीएफच्या जवानांनी बराच वेळ पदाधिकाऱ्यांना समजविण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर दुपारी चार वाजेपर्यंत आरपीएफने अवैध पोस्टर हटविले. युनियनच्या पदाधिकाऱ्यांनी ‘डीआरएम’ रिचा खरे यांच्या समोर आपले मत मांडण्याचा प्रयत्न केला. सायंकाळी उशिरापर्यंत पदाधिकाऱ्यांनी त्यांच्यासोबत चर्चा केली; परंतु कार्यालयीन शिस्त आणि सुंदरता राखण्यासाठी डीआरएम रिचा खरे यांनी सर्वांना सहकार्य करण्याचे आवाहन केले. यावेळी सेंट्रल रेल्वे मजदूर संघाचे अध्यक्ष वीरेंद्र सिंह, सचिव जी. एम. शर्मा, नॅशनल रेल्वे मजदूर युनियनचे कार्यकारी अध्यक्ष हबीब खान यांसह पदाधिकारी उपस्थित होते.
............