मनपाकडून कोरोनाबाधितांचा शोध. २५० जणांची तपासणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 14, 2021 04:09 IST2021-02-14T04:09:41+5:302021-02-14T04:09:41+5:30
आयुक्तांची नजर: कोविड नियंत्रणासाठी झोन स्तरावर पथक गठीत लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : शहरात कोरोनाबाधितांची वाढती संख्या विचारात ...

मनपाकडून कोरोनाबाधितांचा शोध. २५० जणांची तपासणी
आयुक्तांची नजर: कोविड नियंत्रणासाठी झोन स्तरावर पथक गठीत
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : शहरात कोरोनाबाधितांची वाढती संख्या विचारात घेता, मनपा प्रशासन सतर्क झाले आहे. आयुक्त राधाकृष्णन बी. यांनी ज्या नवीन ९ हॉटस्पॉटची घोषणा केली होती. अशा भागात संक्रमितांच्या संपर्कात आलेल्या लोकांचे स्क्रीनिंग सुरू केली आहे. शनिवारी २५० लोकांची तपासणी करण्यात आली. कॉन्टॅक्ट ट्रेसिंग व कोविड तपासणीची प्रक्रिया या भागात वाढविण्यात आली आहे. झोन स्तरावर विशेष पथक गठीत करण्यात आले असून, संक्रमितांचे घर व आजूबाजूच्या शेजाऱ्यांची माहिती संकलित केली जात आहे.
विशेष म्हणजे, महापालिका आयुक्तांनी खामला, स्वावलंबीनगर, जयताळा, अयोध्यानगर, न्यू बिडीपेठ, वाठोडा, दिघोरी, जरीपटका, जाफरनगरात अधिक संक्रमित आढळल्यामुळे या भागांना हॉटस्पॉटच्या श्रेणीत टाकले होते. त्यानंतर, झोन स्तरावर टीम तैनात करून कॉन्टॅक्ट ट्रेसिंगची सुरुवात करण्यात आली. शनिवारी आरोग्य विभागाच्या पथकांनी संशयितांची तपासणी व स्क्रीनिंग केली. महापालिका आयुक्त, महापौर व पदाधिकाऱ्यांनी भविष्यातील आव्हानांना तोंड देण्यासाठी रूपरेषा ठरविली. महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त संजय निपाने यांनी सांगितले की, शुक्रवारी आयुक्तांनी बैठकीत वाढत असलेल्या हॉटस्पॉटबाबत दिशा-निर्देश दिले होते. त्यानंतर, त्वरित टीम सक्रिय करण्यात आल्या. संक्रमितांच्या संपर्कात आलेल्या नागरिकांची ओळख पटविण्यात येत आहे. संक्रमिताच्या संपर्कात आलेल्या २० नागरिकांची ओळख पटवून त्यांची तपासणी करण्यात येणार आहे. महापालिकेचे आरोग्य अधिकारी डॉ.संजय चिलकर यांनी सांगितले की, शनिवारी सकाळी टीम सक्रिय होत्या. लक्ष्मीनगर झोनमध्ये ६९, हनुमाननगर झोनमध्ये ४०, नेहरूनगर झोनमध्ये ३७, मंगळवारी झोनमध्ये ४० यासह बहुतांश परिसरात तपासणी व स्क्रीनिंग सुरू करण्यात आली आहे.
आरटीपीसीआर टेस्ट केले जात आहे. संशयित रुग्णांना रिपोर्ट येईपर्यंत सावधगिरी बाळगण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. मनमानी करणाऱ्यांना क्वारंटाइन करण्याचा पर्याय खुला ठेवण्यात आला आहे, परंतु नागरिक मदत करीत नाहीत.
...
शहरभरात होणार सर्व्हे
ज्या पद्धतीने कोरोनाचा संसर्ग वाढल्यानंर मनपातर्फे घरोघरी जाऊन स्क्रीनिग सुरू केली होती. त्याचप्रकारे, पुन्हा मोठ्या प्रमाणावर स्क्रीनिंग सुरू करण्यात येणार असल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली आहे. प्रशासनाने सर्व अधिकाऱ्यांना व कर्मचाऱ्यांना अलर्ट केले आहे. ज्या भागामध्ये कमी रुग्ण सापडले आहेत, तिथेही पथक पाठवून आवश्यक पाऊल उचलण्याचे निर्देश शनिवारी सहायक आयुक्तांना देण्यात आले आहे.