बोगस बियाण्याच्या शोधात धाडसत्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 19, 2016 03:02 IST2016-06-19T03:02:39+5:302016-06-19T03:02:39+5:30

अद्याप मान्सून विदर्भात दाखल झाला नसला तरी जिल्ह्यातील भोळ्याभाबड्या शेतकऱ्यांची फसवणूक करण्यासाठी बोगस बियाणे मात्र बाजारात उतरले आहे.

In search of bogus seeds | बोगस बियाण्याच्या शोधात धाडसत्र

बोगस बियाण्याच्या शोधात धाडसत्र

‘सोना राजा’च्या नावावर ‘सोना राजा गोल्ड’ची विक्री :
साठा पुस्तकात आढळली बोगस बियाण्याची नोंद
नागपूर : अद्याप मान्सून विदर्भात दाखल झाला नसला तरी जिल्ह्यातील भोळ्याभाबड्या शेतकऱ्यांची फसवणूक करण्यासाठी बोगस बियाणे मात्र बाजारात उतरले आहे. शनिवारी ‘लोकमत’ने हैदराबाद येथील अशाच एका कंपनीच्या बोगस बियाण्यांचा भंडाफोड केला. ‘लोकमत’च्या बातमीने संबंधित कृषी अधिकाऱ्यांची झोप उडाली.
शनिवारी दुपारी जिल्ह्यचे परवाना अधिकारी तथा कृषी विकास अधिकारी सुबोध मोहरील यांच्या नेतृत्वात जिल्हा भरारी पथकाने कन्हान येथील काही बियाणे विक्री केंद्रांवर धडक दिली. मात्र तोपर्यंत संबंधित दुकानदाराने बोगस बियाण्यांच्या साठ्याची व्यवस्थित विल्हेवाट लावली होती. तरी चौकशीदरम्यान योगिराज फर्टिलायझर नावाच्या दुकानातील साठापुस्तकात ‘सोना राजा गोल्ड पॉलिमर ट्रीटेड’ या नावाच्या वाणाच्या २४ बॅगची (प्रत्येकी १० किलो) आवक अशी नोंद आढळून आली; शिवाय त्यापैकी दोन बॅग शेतकऱ्याला विक्री केल्याचेही निदर्शनास आले. यावरून संबंधित कंपनीच्या ‘सोना राजा गोल्ड पॉलिमर ट्रीटेड’ या वाणाला परवानगी नसताना त्यांची जिल्ह्यात सर्रास विक्री झाल्याचे सिद्ध झाले. मात्र एवढे ठोस पुरावे हाती लागल्यानंतरही कृषी विभागातील काही अधिकारी थातूरमातूर चौकशीचा देखावा करून, संबंधित कंपनी आणि बियाणे विक्रेत्यांची पाठराखण करीत असल्याचे दिसून येत आहे. त्या कंपनीकडे ‘सोना राजा’ या वाणाच्याच विक्रीचा परवाना असताना, त्या एकाच परवान्यावर ‘सोना राजा’ आणि ‘सोना राजा गोल्ड पॉलिमर ट्रीटेड’ अशा दोन वेगवेगळ्या बॅगमध्ये बियाणे विकले जात असून, त्याची बियाणे विक्रेत्याच्या साठापुस्तकात स्पष्ट नोंद आढळून आली आहे. असे असताना कृषी विभागातील चौकशी अधिकाऱ्यांनी मात्र साठापुस्तक आणि शेतकऱ्याकडील पावतीवरील ‘सोना राजा गोल्ड’ असे वाणाचे नाव चुकीने नोंदविण्यात आल्याचा जावाईशोध लावून, संपूर्ण प्रकरण दडपण्याचा प्रयत्न चालविला आहे. चौकशी अधिकाऱ्यांच्या या भूमिकेवर तक्रारकर्त्या शेतकऱ्यांनी तीव्र संताप व्यक्त करून, स्वत: कृषी अधिकारीच बोगस बियाण्यांना असे संरक्षण देत असेल तर शेतकऱ्यांनी कुठे न्याय मागावा, असा सवाल उपस्थित केला जात आहे.
विशेष म्हणजे, स्वत: कृषी विभागाच्या परवान्यानुसार त्या कंपनीला महाराष्ट्रात १४ वाण विक्रीस परवानगी देण्यात आली असून त्यात सोना राजा, सोनम-२०१, सोनम ३०६, बलवान (डीआरके), एमटीयू-१०१०, आयआर-६४, जेजीएल-१७९८, जेजीएल-३८४, बीपीटी-५२०४, एमटीयू-१००१, डब्ल्यूजीएल-१४ व एचएमटी-सोना या वाणांचा समावेश आहे. असे असताना संबंधित कंपनी केवळ ‘सोना राजा ’ हे नाव पुढे करून, ‘सोना राजा गोल्ड पॉलिमर ट्रीटेड’ हे दुसरेच वाण बाजारात विक्री करीत होते. (प्रतिनिधी)


कृषी अधिकाऱ्यांचा गोलमाल
या संपूर्ण प्रकरणात शनिवारी दिवसभर कृषी विभागातील अधिकाऱ्यांचा चांगलाच गोलमाल चालला. संबंधित कंपनी आणि दुकानदाराविरुद्ध ठोस पुरावे हाती लागल्यानंतरही त्यांच्याविरुद्ध कठोर कारवाई करण्याऐवजी सारवासारव केली जात होती. वास्तविक सुबोध मोहरील यांच्या नेतृत्वातील या चौकशी पथकात रामटेकचे उप विभागीय कृषी अधिकारी मिलिंद लाड, मोहीम अधिकारी विजय मेंडजोगे, जिल्हा गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक मनोज केचे, तंत्र अधिकारी गच्छे व खोरगे यांचा समावेश होता. मात्र चौकशी अधिकाऱ्यांच्या गोलमालामुळे तक्रारकर्त्या शेतकऱ्यांनी या संपूर्ण प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करून, संबंधित कंपनी आणि दुकानदाराविरुद्ध कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

सोनम कंपनीला नोटीस
कृषी विभागातील काही अधिकारी संबंधित कंपनीची पाठराखण करीत असताना विभागीय कृषी सहसंचालक कार्यालयाने मात्र प्रकरणाची गंभीरता लक्षात घेऊन संबंधित कंपनीला नोटीस बजावली आहे. शिवाय विभागीय तंत्र अधिकारी (गुणवत्ता नियंत्रण) गावंडे यांनी यासंबंधी पुणे येथील कृषी आयुक्तालयाला सुद्धा कळविण्यात आल्याचे सांगितले. गावंडे यांनी शुक्रवारी संबंधित कंपनीच्या ‘सोना राजा गोल्ड’ या बियाण्यांवर विक्री बंदी आदेश जारी केले होते. मात्र कृषी विभागातील एक अधिकारी अशाप्रकारे संबंधित कंपनीविरूद्ध कठोर भूमिका घेत असताना, दुसरे काही अधिकारी मात्र त्याच कंपनीची आणि बियाणे विक्रेत्यांची पाठराखण करताना दिसून येत आहे.

 

Web Title: In search of bogus seeds

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.