सी-प्लेन उड्डाणासाठी लागणार दीड वर्ष
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 23, 2017 01:08 IST2017-08-23T01:07:04+5:302017-08-23T01:08:39+5:30
विदर्भातील पर्यटन स्थळांना जागतिक नकाशावर आणून पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी महाराष्टÑ मेरिटाइम बोर्डाने नागपूरहून ‘सी-प्लेन’ संचालित करण्याची योजना तयार केली आहे.

सी-प्लेन उड्डाणासाठी लागणार दीड वर्ष
राजीव सिंह ।
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : विदर्भातील पर्यटन स्थळांना जागतिक नकाशावर आणून पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी महाराष्टÑ मेरिटाइम बोर्डाने नागपूरहून ‘सी-प्लेन’ संचालित करण्याची योजना तयार केली आहे. ताडोबा जंगल ते कोराडी देवस्थान व तीर्थक्षेत्र शेगावला सी प्लेनच्या माध्यमातून जोडण्याची योजना आहे. या प्रकल्पासाठी तीन दिवसांपूर्वीच निविदा काढण्यात आली आहे. या प्रकल्पाबाबत सोमवारी नासुप्रमध्ये एक बैठकही झाली. प्रत्यक्षात सी-प्लेनला उड्डाण भरण्यासाठी दीड वर्षांचा कालावधी लागण्याची शक्यता आहे.
सी-प्लेन च्या संचालनासाठी निविदाकारांकडून १८ सप्टेंबरपर्यंत डीपीआरसोबत अर्ज मागविण्यात आले आहेत. विशेष म्हणजे मेरिटाइम बोर्डातर्फे काढण्यात आलेल्या निविदेत नागपूरचा उल्लेख मुख्य डेस्टिनेशन म्हणून केलाआहे. यात अंबाझरी तलावाचा मात्र उल्लेख नाही. मेरिटाइम बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अतुल पाटणे यांनी अंबाझरी तलावातूनच सी-प्लेनला विदर्भाच्या इतर भागातील तलाव व धरणांशी जोडले जाईल व अंबाझरीतूनच मुख्य संचालन होईल, असे लोकमतशी बोलताना स्पष्ट केले. ‘सी-प्लेन’ च्या संचालनाचा तीन वर्षांचा अनुभव असणारेच अर्ज करू शकतील. उड्डयनाशी संबंधित परवानग्या डीजीसीएकडून स्वत:च घ्याव्या लागतील. सोबतच निविदा दाखल करताना संबंधित कंपनीला पाच लाख रुपयांचा डिमांड ड्राफ्ट जमा करावा लागेल. ही रक्कम परत मिळणार नाही. पायाभूत सुविधा अंतर्गत जेट्टी व टर्मिनल बिल्डिंग मेरिटाइम बोर्ड तयार करून देइल. पहिल्या टप्प्यात १० वर्षांसाठी हा प्रकल्प राबविला जाईल. त्यानंतर पुन्हा १० वर्षे मुदतवाढ दिली जाईल.
येथून उडणार सी-प्लेन
कोराडी : कोराडी मंदिराजवळील तलावाची खोली पाच मीटरहून अधिक व लांबी एक किमीहून अधिक आहे. शिवाय कोराडीतील जगदंबा माता मंदिरात दर्शनाला येणाºया भाविकांची संख्या मोठी आहे. राष्ट्रीय महामार्गही जवळच आहे.
ताडोबा : चंद्रपूर जिल्ह्यातील भद्रावती येथे ताडोबा नॅशनल पार्क ६२५ वर्ग किमीमध्ये पसरले आहे. या परिसरात ताडोबा तलाव १० मीटरहून अधिक खोल व एक किमीहून अधिक लांब आहे. त्यामुळे यालाही सी-प्लेन प्रकल्पाशी जोडले जाईल.
शेगाव : गजानन महाराज यांच्या दर्शनासाठी हजारो भाविक शेगावला जातात. अकोला जिल्ह्यातील बाळापूर तालुक्यात येणाºया या तीर्थक्षेत्राजवळ पारस येथे मोठे धरण आहे. याची खोली १० मीटर व लांबी १ किमी आहे. फक्त २५ मीटर अंतरावर राष्ट्रीय महामार्ग आहे. ही परिस्थिती प्रकल्पासाठी अनुकूल आहे.
अंमलबजावणीत थोडा वेळ लागेल
सी-प्लेन प्रकल्पासाठी निविदा काढण्यात आली आहे. विविध प्रकारच्या परवानग्या, पायाभूत विकास यासह मार्गांचेही सर्वेक्षण केले जाईल. त्यामुळे प्रकल्पाची प्रत्यक्ष अंमलबजावणी होण्यास एक ते दीड वर्षांचा कालावधी लागू शकतो. उत्सुक कंपन्या पुढे आल्यानंतरच रूपरेखा निश्चित होईल. अंबाझरी तलावाला कोराडी, ताडोबा व शेगावच्या तलावांशी जोडून सी-प्लेनचा मार्ग निश्चित केला जाईल. जॉय राइडिंगसोबतच त्याच्या विविध उपयोगांवर भर दिला जाईल.
- अतुल पाटणे, मुख्य कार्यकारी अधिकारी, महाराष्टÑ मेरिटाइम बोर्ड
टूर्स, ट्रॅव्हल्स आणि हॉटेल व्यावसायिकांसोबत चर्चा
पर्यटक हा सी-प्लेन प्रकल्पाचा मुख्य केंद्रबिदू असल्याने त्यांना देण्यात येणाºया पर्यटन सुविधाबद्दल चर्चा करण्यासाठी महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळच्या विद्यमाने टूर्स, टॅÑव्हल्स अॅण्ड हॉटेल असोशिएशनची बैठक महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळच्या कार्यालयात घेण्यात आली. बैठकीला नासुप्रचे सभापती डॉ. दीपक म्हैसेकर,महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक विजय वाघमारे उपस्थित होते. पर्यटक हा मुख्य घटक असल्याने पर्यटन सेवा त्याला सुलभ व स्वस्त दरात उपलब्ध करून द्यावी, पर्यटकांना पर्यटनास आकर्षित करणारे व सोईचे ठरणारे प्रवासी पॅकेज दिल्या जावे इत्यादी सूचना या ठिकाणी उपस्थित असोसिएशनच्या प्रतिनिधींना देण्यात आल्या. तसेच पर्यटन सेवा नियोजनबद्ध असावी जेणेकरून व्यावसायिक स्तरावर सी प्लेन प्रकल्पाला यश प्राप्त करता येईल तसा व्यवहार्यता अहवाल नासुप्रला सादर करावा. व्यवसायकांनी आपल्या स्तरावर सी प्लेन प्रकल्पाचा प्रचार आणि प्रसार करून विदर्भ पर्यटनास उत्तेजना मिळवून द्यावी असे आवाहनही डॉ. म्हैसेकर यांनी केले.
प्रस्तावित मार्ग
नागपूर - ताडोबा
नागपूर- इरई
नागपूर-सिरोंचा
नागपूर -नवेगाव (खैरी)
नागपूर -नागझिरा
नागपूर -नवेगाव डॅम (पेंच)
नागपूर -शेगाव
नागपूर सिटी जॉय राईड
टीप : यात बदल होण्याची शक्यता आहे.