वीज ग्राहकांच्या खिशाला कात्री
By Admin | Updated: January 5, 2015 00:51 IST2015-01-05T00:51:11+5:302015-01-05T00:51:11+5:30
अनियमित सेवा, भारनियमन व ब्रेकडाऊनचा ससेमिरा, त्यातच अवाजवी येणारे विजेचे बिल यामुळे सामान्य वीज ग्राहकांचा जीव आधीच मेटाकुटीस आला आहे. एवढे असूनही महावितरण कंपनीने

वीज ग्राहकांच्या खिशाला कात्री
महावितरण कंपनीचा प्रताप : अतिरिक्त वीज आकारणीमुळे ग्राहकांत संभ्रम
शरद मिरे - भिवापूर
अनियमित सेवा, भारनियमन व ब्रेकडाऊनचा ससेमिरा, त्यातच अवाजवी येणारे विजेचे बिल यामुळे सामान्य वीज ग्राहकांचा जीव आधीच मेटाकुटीस आला आहे. एवढे असूनही महावितरण कंपनीने डिसेंबर २०१४ च्या वीज बिलात अतिरिक्त वीज आकाराच्या नावाखाली महिन्याला हजारो रुपये वसूल करायला सुरुवात करून ग्राहकांच्या खिशाला कात्री लावली आहे. या अतिरिक्त वीज आकारामुळे ग्रामीण भागातील सामान्य वीज ग्राहकांत संभ्रम निर्माण झाला आहे.
नोव्हेंबर २०१४ पर्यंत प्राप्त झालेल्या वीज बिलांमध्ये या अतिरिक्त वीज आकाराचा उल्लेख नाही. तो पहिल्यांदाच डिसेंबर महिन्याच्या बिलात करण्यात आला आहे. बहुतांश ग्राहक वीज बिलाचा नियमित भरणा करतात.
मात्र, बिलातील कुठल्या सदराखाली किती रक्कम आकारण्यात आली आहे, याची बारकाईने तपासणी करण्यास फारसे कुणी पडत नाही. डिसेंबर महिन्याचे बिल प्राप्त होताच त्यात नियमित बिलापेक्षा यावेळी वाढीव बिल आल्याचे ग्राहकांच्या निदर्शनास आले. त्यामुळे अनेकांनी सदर बिल निरखून बघितले.
यात ‘इतर आकार’ या सदराखाली महावितरण कंपनीने अतिरिक्त आकार, असे नमूद करून अतिरिक्त शुल्क आकारल्याचे लक्षात आले. ही अतिरिक्त रक्कम नेमकी कशाची? याची चौकशी करण्याचा ग्राहकांनी प्रयत्न केला. मात्र, त्याचे महावितरण कंपनीच्या कर्मचाऱ्यांनीही स्पष्टीकरण दिले नाही, असे ग्राहकांनी सांगितले. काहींनी ही रक्कम ‘डिमांड’ची असल्याचे सांगितले तर, काहींनी वीज बिलात वाढ झाल्याचे सांगून हात वर केले. या नव्या शब्दप्रयोगामुळे सारेच बुचकळ्यात पडले आहेत.
केशव रोकडे, रा. भिवापूर यांच्या नावे आलेल्या बिलात तब्बल २,५९७ रुपये अतिरिक्त आकार लावण्यात आला आहे. डिसेंबर महिन्यात त्यांना ११ हजार ३२० रुपयांचे बिल पाठविण्यात आले. भिवापुरातील रामधन चौकात राहणारे यशवंत पराते व हेडाऊ या ग्राहकांच्या बिलात ४०० ते ५०० रुपये अतिरिक्त आकारापोटी आकारण्यात आले आहे. शहरातील बहुतांश सर्वच ग्राहकांना अशाप्रकारच्या आकारणीची बिले पाठविण्यात आली आहेत.