नागपुरात सिकलसेल अनुसंधान केंद्र

By Admin | Updated: June 3, 2014 02:54 IST2014-06-03T02:54:36+5:302014-06-03T02:54:36+5:30

महाराष्ट्रासह भारतातील अनेक राज्यात सिकलसेल आजाराची गंभीर समस्या आहे.

Scientes Research Center in Nagpur | नागपुरात सिकलसेल अनुसंधान केंद्र

नागपुरात सिकलसेल अनुसंधान केंद्र

गडकरी यांची घोषणा : केंद्रीय आरोग्यमंत्र्यांची तत्त्वत: मंजुरी

नागपूर : महाराष्ट्रासह भारतातील अनेक राज्यात सिकलसेल आजाराची गंभीर समस्या आहे. विदर्भातील नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली,वर्धा, चंद्रपूर, अमरावती व यवतमाळ आदी जिल्ह्यात या आजाराचे प्रमाण अधिक आहे. यात प्रामुख्याने आदिवासी व मागासवर्गीय घटकातील लोकांचा समावेश आहे. या रुग्णांना चांगले उपचार मिळावे, यासाठी उत्तर नागपुरात सिकलसेल अनुसंधान केंद्र उभारणार असल्याची घोषणा केंद्रीय परिवहन व जहाज बांधणी मंत्री नितीन गडकरी यांनी सोमवारी केली. पं.दीनदयाल उपाध्याय इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स रिसर्च अँण्ड ह्युमन सिसोर्सेसच्या वेबसाईटचे लोकार्पण प्रसंगी ते बोलत होते.

छत्तीसगड सरकारने रायपूर येथे सिकलसेल सिसोर्सेस संस्था सुरू केलेली आहे. या संस्थेची मदत घेण्याचा प्रयत्न आहे. नागपूर शहरात सिकलसेल असोसिएशनच्या माध्यमातून मागील १२ वर्षांपासून सिकलसेल नियंत्रणासाठी प्रयत्न सुरू आहेत. परंतु सिकलसेल आजाराची समस्या दिवसेंदिवस वाढत आहे. यावर नियंत्रण आणण्यासाठी सिकलसेल अनुसंधान केंद्राला मंजुरी देण्याची सूचना गडकरी यांनी केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ. हर्षवर्धन याना पाठविलेल्या पत्रातून केली आहे. त्यांनी या प्रकल्पाला तत्वत: मान्यता दिली आहे. या प्रकल्पासंदर्भात त्यांच्याशी विस्तृत चर्चा करणार असल्याची माहिती गडकरी यांनी दिली. उत्तर नागपुरात १00 कोटीचे सिकलसेल अनुसंधान केंद्र उभारण्याची मागणी नागपूरच्या सिकलसेल असोसिएशनने केल्याची माहिती गडकरी यांनी दिली. शहर व ग्रामीण भागातील रुग्णालयात चांगले उपचार मिळत नाही. मेयो, मडिकल यासारख्या रुग्णालयात गरीब रुग्णांना औषधी मिळत नाही. त्यांना बाहेरून आणावी लागते. यावर नाराजी व्यक्त केली. गरीब व गरजुंना मोफत व माफक दरात उपचार उपलब्ध करण्याचा प्रयत्न असल्याचे गडकरी म्हणाले. (प्रतिनिधी)

मेयो-मेडिकलचे अपग्रेडेशन करणार

गरीब रुग्णांना मोफत व माफक दरात उपचार मिळावे, यासाठी मेयो, मेडिकल रुग्णालयांचे अपग्रेडेशन करण्याचा विचार आहे. या संदर्भात राज्य सरकारशी चर्चा करू अशी ग्वाही गडकरी यांनी प्रश्नाच्या उत्तरात दिली.

विधिमंडळ अधिवेशनाला जाणार

राज्य विधिमंडळाशी आठवणी जुळलेल्या आहेत. त्या विसरता येणार नाही. अधिवेशनादरम्यान मुंबईला जाणार आहे. विधानभवनात जाणार असून मुख्यमंत्री, मंत्री यांची भेट घेऊ न राज्यातील विकासासंदर्भात चर्चा करणार असल्याची माहिती गडकरी यांनी दिली.

Web Title: Scientes Research Center in Nagpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.