विज्ञानप्रेमींचा वाढतोय रमण सायन्स केंद्राकडे ओढा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 31, 2018 19:44 IST2018-05-31T19:44:32+5:302018-05-31T19:44:42+5:30
विज्ञानप्रेमींसाठी हक्काचे ठिकाण असलेल्या ‘रमण सायन्स सेंटर’ची लोकप्रियता वाढीस लागली आहे. शहरातील विद्यार्थी व नागरिकांचा या केंद्रात येऊन विज्ञानाच्या गमतीजमती अनुभवण्याकडे कल दिसून येत आहे. मागील तीन वर्षांपासून सातत्याने येथे भेट देणाऱ्यांची संख्या वाढत आहे. २०१५ सालापासून येथे २८ लाखांहून अधिक नागरिकांनी भेट दिली आहे. माहितीच्या अधिकारातून ही बाब समोर आली आहे.

विज्ञानप्रेमींचा वाढतोय रमण सायन्स केंद्राकडे ओढा
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : विज्ञानप्रेमींसाठी हक्काचे ठिकाण असलेल्या ‘रमण सायन्स सेंटर’ची लोकप्रियता वाढीस लागली आहे. शहरातील विद्यार्थी व नागरिकांचा या केंद्रात येऊन विज्ञानाच्या गमतीजमती अनुभवण्याकडे कल दिसून येत आहे. मागील तीन वर्षांपासून सातत्याने येथे भेट देणाऱ्यांची संख्या वाढत आहे. २०१५ सालापासून येथे २८ लाखांहून अधिक नागरिकांनी भेट दिली आहे. माहितीच्या अधिकारातून ही बाब समोर आली आहे.
उपराजधानीतील माहिती अधिकार कार्यकर्ते अभय कोलारकर यांनी माहितीच्या अधिकाराअंतर्गत ‘रमण सायन्स सेंटर’कडे विचारणा केली होती. ‘रमण सायन्स सेंटर’मध्ये केंद्राकडून किती निधी प्राप्त झाला, यातील किती निधी खर्च झाला, मागील तीन वर्षांत किती लोकांनी येथे भेट दिली, केंद्राचे उत्पन्न किती झाले, इत्यादी प्रश्न त्यांनी उपस्थित केले होते. प्राप्त झालेल्या अधिकृत माहितीनुसार १ एप्रिल २०१५ ते ३१ मार्च २०१८ या तीन वर्षांच्या कालावधीत ‘रमण सायन्स सेंटर’मधील विज्ञान प्रयोग तसेच येथे आयोजित उपक्रमांना पाहण्यासाठी २८ लाख ६ हजार २०६ नागरिकांनी भेट दिली. विशेष म्हणजे २०१५-१६ च्या तुलनेत २०१७-१८ मध्ये भेट देणाºयांचे प्रमाण ७४ टक्क्यांनी वाढले. संख्येमध्ये हा आकडा चार लाखांहून अधिक आहे.
‘रमण सायन्स सेंटर’ला तीन वर्षांमध्ये २ कोटी ९२ लाख ६१ हजार रुपयांचे उत्पन्न प्राप्त झाले. तर विविध उपक्रम व कार्यक्रमांवर केंद्रातर्फे ७५ लाख २७ हजार रुपये खर्च करण्यात आले.
वर्षनिहाय उत्पन्न
वर्ष उत्पन्न
२०१५-१६ ९६,८८,०००
२०१६-१७ ९३,४६,०००
२०१७-१८ १,०२,२७,०००
वर्षनिहाय भेटी
वर्ष अभ्यागत
२०१५-१६ ६,६५,९२६
२०१६-१७ ९,७६,५६०
२०१७-१८ ११,६३,७२०