कृषीच्या विकासासाठी विज्ञानाची जोड महत्त्वाची
By Admin | Updated: December 13, 2015 02:59 IST2015-12-13T02:59:08+5:302015-12-13T02:59:08+5:30
देशात शेतकरी आणि कृषी क्षेत्राचा विकास करायचा असेल तर शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञान उपलब्ध देताना विज्ञानाची जोड असायला हवी,....

कृषीच्या विकासासाठी विज्ञानाची जोड महत्त्वाची
राधामोहन सिंग यांचे प्रतिपादन : ‘अॅग्रो व्हिजन’च्या कार्यशाळांचे उद्घाटन
नागपूर : देशात शेतकरी आणि कृषी क्षेत्राचा विकास करायचा असेल तर शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञान उपलब्ध देताना विज्ञानाची जोड असायला हवी, असे प्रतिपादन केंद्रीय कृषिमंत्री राधामोहन सिंग यांनी येथे केले. ‘अॅग्रो व्हिजन’ या राष्ट्रीय कृषी प्रदर्शनांतर्गत आयोजित कार्यशाळांचे उद्घाटन त्यांच्या हस्ते शनिवारी झाले. त्याप्रसंगी मुख्य अतिथी म्हणून ते बोलत होते. अध्यक्षस्थानी अॅग्रो व्हिजनचे प्रवर्तक केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक आणि जहाजबांधणी मंत्री नितीन गडकरी होते.
या समारंभात खासदार कृपाल तुमाने व नाना पटोले, आमदार आशिष देशमुख, अॅग्रो व्हिजनचे संयोजक गिरीश गांधी, ज्येष्ठ नेते दत्ता मेघे, जिल्हा परिषद अध्यक्ष निशा सावरकर, माफसुचे कुलगुरू आदित्यकुमार मिश्रा, पंजाबराव कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. रविप्रकाश दाणी, सीआयसीआरचे संचालक डॉ. केशव क्रांती, अॅग्रो व्हिजनचे संयोजक सचिव रवी बोरटकर व रमेश मानकर, अॅग्रोव्हिजन सल्लागार समितीचे अध्यक्ष व कृषी शास्त्रज्ञ नेमणूक मंडळाचे माजी अध्यक्ष डॉ. सी.डी. मायी, संतोष जैन, आनंदराव राऊत उपस्थित होते. (प्रतिनिधी)
५८५ बाजारपेठांना राष्ट्रीय कृषी विपणन केंद्राशी जोडणार
शेतकऱ्यांना आपले उत्पादन देशभरात कोठेही विकता यावे, यासाठी ‘राष्ट्रीय कृषी विपणन केंद्र’ तयार करण्याच्या दृष्टीने केंद्र सरकारने पुढाकार घेतला आहे. पुढील वर्षांच्या अखेरपर्यंत देशातील ५८५ बाजारपेठांना राष्ट्रीय कृषी विपणन केंद्रांशी जोडण्यात येणार आहे. मार्चपर्यंत २०० बाजारपेठांना जोडण्यात येणार आहे. प्रत्येक बाजाराला ३० लाख आणि आयटी उत्पादने देण्यात येणार आहे. आज विज्ञान-तंत्रज्ञानाचा अवलंब केल्याशिवाय शेतीचा विकास होणार नाही, याकडे त्यांनी लक्ष वेधले.
नागपूर ‘कृषी राजधानी’चे शहर
नागपूर हे देशाच्या मध्यवर्ती भागात असून हे शहर कृषी राजधानी व्हावी, अशी प्रतिक्रिया गडकरी यांच्या वक्तव्यानंतर सिंग यांनी दिली. या भागातील शेतकऱ्यांचे समाधान करण्यासाठी नितीन गडकरी सक्षम आहेत. त्यांना कृषी क्षेत्राची जाण आहे. त्यांच्या मागण्या पूर्ण करण्याचे आश्वासन त्यांनी दिले.
‘मृदा आरोग्य पत्रिका’ फायद्याची
केंद्र्र सरकारच्या कृषी धोरणामध्ये, शेतकऱ्याला आणि त्यांच्या कल्याणास मध्यवर्ती स्थान असून शेतीक्षेत्राचा बहुमुखी विकास आणि शेतकऱ्यांचे कल्याण या उद्देशाने प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना, मृदा आरोग्य पत्रिका (सॉईल हेल्थ कार्ड) यासारख्या योजना सरकारने सुरू केल्याचे राधामोहन सिंग यांनी सांगितले. येत्या मार्च-एप्रिलपर्यंत पाच कोटी शेतकऱ्यांना मृदा आरोग्य पत्रिका (सॉईल टेस्टिंग कार्ड) दिल्या जातील आणि २०१७ पर्यंत देशातील सर्व शेतकऱ्यांना मृदा आरोग्य पत्रिका देण्याचे उद्दिष्ट केंद्र सरकारने निर्धारित केले आहे.
पंतप्रधान कृषी सिंचन योजना
भारतातील ६० टक्के शेती अजूनही पावसावर असलंबून असून, प्रत्येक शेतकऱ्याच्या शेतापर्यंत पाणी पोहचविण्याचे स्वप्न साकारण्यासाठी ‘पंतप्रधान कृषी सिंचन योजना’ तयार करण्यात आली आहे. पुढील पाच वर्षांत प्रत्येक शेतकऱ्याच्या शेतापर्यंत पाणी पोहोचल, असे नियोजन केंद्र सरकार करीत असल्याचे त्यांनी सांगितले. खतांच्या असंतुलित वापरामुळे, जमिनीचे आरोग्य तपासून, त्यानुसार संतुलित खतांचा वापर करता यावा, यादृष्टीने ‘मृदा आरोग्य पत्रिका योजना’ अत्यंत महत्त्वाची असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. दृष्काळी परिस्थितीत महाराष्ट्र सरकारने केलेल्या उपाययोजनांची सिंग यांनी प्रशंसा केली. केंद्रातील सरकारने पूर्वीच्या महाराष्ट्र सरकारला सिंचनासाठी ५० हजार कोटी दिले होते, पण ते शेतकऱ्यांपर्यंत पोहोचले नाही, असा आरोप सिंग यांनी केला. महाराष्ट्रातील जलयुक्त शिवार प्रकल्पाची सिंग यांनी प्रशंसा केली.