दोन वर्षांपासून उभ्या असलेल्या स्कूलव्हॅन मालकांना आता फायनान्सरच्या धमक्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 22, 2021 04:09 IST2021-08-22T04:09:54+5:302021-08-22T04:09:54+5:30
नागपूर : कोरोना संक्रमणामुळे शाळा बंद असल्याने मागील दोन वर्षांपासून स्कूलबस आणि स्कूलव्हॅन ठप्प आहेत. खासगी बँका आणि फायनान्सरकडून ...

दोन वर्षांपासून उभ्या असलेल्या स्कूलव्हॅन मालकांना आता फायनान्सरच्या धमक्या
नागपूर : कोरोना संक्रमणामुळे शाळा बंद असल्याने मागील दोन वर्षांपासून स्कूलबस आणि स्कूलव्हॅन ठप्प आहेत. खासगी बँका आणि फायनान्सरकडून घेतलेल्या कर्जावरील या वाहनांपासून मिळणारे उत्पन्न थांबले असले तरी बँका आणि फायनान्सर कंपन्या मासिक हप्ते भरण्यासाठी तगादा लावत असून, वाहन सील करण्याच्या कारवाया करीत आहेत.
नागपुरातील सुमारे १० हजार स्कूल बस आणि व्हॅनच्या माध्यमातून शालेय विद्यार्थ्यांची वाहतूक होत असायची. मासिक शुल्कातून शाळांकडून त्यांना ठरावीक रक्कम मिळायची. मात्र, कोरोना संक्रमणामुळे हा व्यवसायच ठप्प पडला आहे. अनेकांची वाहने कर्जाऊ आहेत. उत्पन्न थांबल्याने जवळपास सर्वांचेच कर्जाचे हप्ते थकले आहेत. अशाही परिस्थितीत फायनान्स कंपन्या वाहनांचे हप्ते भरा, अन्यथा वाहन परत करा, अशा नोटिसा बजावत आहेत. काही कंपन्यांकडून कर्मचारी घरी पाठवून धाकदपटशा केली जात असल्याचा आणि वाहने ताब्यात घेण्याचा प्रकार घडत असल्याचे प्रकार घडत आहेत.
शालेय विद्यार्थी वाहतूक व्यवसाय संघटनेच्या माध्यमातून यासाठी प्रशासनाकडे आणि जनप्रतिनिधींकडे पत्रव्यवहार झाला आहे. मात्र, यावर कोणीच बोलायला आणि अडचण समजून घ्यायला तयार नाही, अशी व्यथा संघटनेचे अध्यक्ष चंद्रकांत जंगले यांनी मांडली आहे. वर्षभरापूर्वी राष्ट्रीयीकृत बँकांनी काही वाहनमालकांच्या कर्जाचे पुनर्गठण केले होते. तात्पुरती सूट मिळाली असली तरी त्यातील तरतुदीमुळे आर्थिक भार पुन्हा वाढला. दोन वर्षांपासून वाहन उभे असल्याने वाहनाचे टायर, बॅटऱ्या निकामी झाल्या आहेत. मेन्टेनन्सचा खर्चही वाढला आहे. मात्र, प्राप्तिकरातून कसलीही सूट मिळालेली नाही. टॅक्स आणि इन्शुरन्स थकल्याने आता आरटीओकडूनही नोटिसा यायला लागल्याने हे वाहतूकदार चांगलेच अडचणीत आले आहेत.
...
आम्ही आजवर नियमित हप्ते भरले. शासनाचा करही भरला. शाळा बंद असल्याने उत्पन्न ठप्प झाले. अशाही स्थितीत सरकार, परिवहन विभाग आम्हाला समजून घ्यायला तयार नाही. आमचा गुन्हा काय, हे तरी कोणी समजावून सांगावे.
- सचिन येलुरे, वाहनमालक
...
सरकारने इन्शुरन्सचे वर्गीकरण करून द्यावे. बंद काळातील टॅक्स माफ करावा. कर्जाचे हप्ते आम्ही भरू, मात्र त्यासाठी मुदतवाढ द्यावी. सरकारने आमच्या मागण्यांकडे लक्ष द्यावे. आमच्या कुटुंबीयांवरील संकट ओळखावे.
- उदय आंबुलकर, वाहनमालक
...