स्कूल बस बंद, विद्यार्थ्यांना फटका
By सुमेध वाघमार | Updated: January 2, 2024 19:51 IST2024-01-02T19:51:38+5:302024-01-02T19:51:58+5:30
ट्रक चालक मालक संपात सहभागी झाल्याने पेट्रोलचा पुरवठा होणार नसल्याच्या भीतीने सोमवारी सायंकाळपासून पेट्रोल पंपावर वाहनांच्या रांगा लागल्या होत्या.

स्कूल बस बंद, विद्यार्थ्यांना फटका
नागपूर : केंद्र सरकारने लागू केलेल्या नवीन वाहन कायद्याचा विरोधात ट्रक चालकांनी पुकारलेल्या संपात आता स्कूल बसचे चालकही उतरले आहेत. परिणामी याचा फटका शालेय विद्यार्थ्यांना बसला आहे. मंगळवारी विशेषत: ग्रामीण भागातील शाळांमध्ये विद्यार्थी पोहचू शकले नाही. शहरातही काही स्कूल बस व व्हॅन दुपारनंतर बंद झाल्याने विद्यार्थ्यांना शाळेतून घरी आणण्यासाठी पालकांना धावपळ करावी लागली.
ट्रक चालक मालक संपात सहभागी झाल्याने पेट्रोलचा पुरवठा होणार नसल्याच्या भीतीने सोमवारी सायंकाळपासून पेट्रोल पंपावर वाहन चालकांच्या रांगा लागल्या होत्या. मंगळवारी सकाळपासून अनेक पेट्रोलपंपाच्या बाहेर साठा नसल्याचे बोर्ड लावण्यात आले होते. जे पंप सुरू होते तिथे लांबचलांबरांगा लागल्या होत्या. शहरात बिकट परिस्थिती निर्माण झाली असताना कोणी अधिकारी किंवा लोकप्रतिनिधी पुढे येऊन मार्ग काढत नसल्याने लोक संताप व्यक्त करीत होते. शहर व ग्रामीण भागात नोंदणीकृत ३ हजार ७५७ स्कूल बस व ७६२ स्कूल व्हॅन आहेत. यातील जवळपास ८० टक्क्यांवर बस व व्हॅन बंद असल्याचा दावा स्कूल बस असोसिएशनने केला आहे.