स्कूल बस चालक विकताहेत भाज्या, करताहेत मिळेल ते काम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 13, 2020 04:25 IST2020-12-13T04:25:32+5:302020-12-13T04:25:32+5:30
शाळा बंद असल्याने उपासमारीचे संकट : फायनान्स कंपनीच्या तगाद्यामुळे झाले त्रस्त नागपूर : नागपूर जिल्ह्यात कोरोनाचा पहिला रुग्ण मार्च ...

स्कूल बस चालक विकताहेत भाज्या, करताहेत मिळेल ते काम
शाळा बंद असल्याने उपासमारीचे संकट : फायनान्स कंपनीच्या तगाद्यामुळे झाले त्रस्त
नागपूर : नागपूर जिल्ह्यात कोरोनाचा पहिला रुग्ण मार्च महिन्यात आढळला. तेव्हापासून जिल्ह्यातील शाळा बंद पडल्या. अजूनही शाळा सुरू झालेल्या नाही. पण या शाळांवर अवलंबून असलेला स्कूल बसचा चालक मालक इतका आर्थिक अडचणीत सापडला की, आता तो भाज्या विकतोय किंवा मिळेल ते काम करतो आहे. शाळा बंद पडल्याने त्याच्या कुटुंबीयावर उपासमारीची वेळ आली आहे. अशात ज्या फायनान्स कंपन्यांकडून त्यांनी गाड्या घेतल्या त्यांच्याकडून हप्त्यासाठी होत असलेल्या तगाद्यामुळे तो त्रस्त झाला आहे.
नागपूर जिल्ह्यातील शाळा १५ मार्चपासून बंद झाल्या. जेव्हापासून शाळा बंद झाल्या तेव्हापासून स्कूल बसची चाके आहे त्याच ठिकाणी थांबली आहे. शाळा बंद होण्यापूर्वी ज्या स्कूल बस मालकाकडे २५ ड्रायव्हर होते. त्यांच्याजवळ आता एकही ड्रायव्हर राहिलेला नाही. ज्या स्कूल बसचे मालक, चालक मालक होते. फायनान्सवर गाडी घेऊन रोजगार करीत होते. ते आता कुटुंबीयांसाठी मिळेल ते काम करीत आहे. २००७-०८ पर्यंत मारोती व्हॅनमध्ये विद्यार्थ्यांना शाळेत पोहचविले जायचे. आरटीओने नियम लावल्यानंतर या व्हॅनचालकांनी स्कूलबससाठी पिवळ्या रंगाच्या गाड्या घेतल्या. आज शहरातील ९० टक्के स्कूलबस ह्या फायनान्सवर घेतल्या आहे. त्यांचे महिन्याचे हप्ते ९ ते १५ हजाराच्या जवळपास आहे. आता १० महिन्यापासून काम नसल्याने त्यांना हप्ते भरणे अवघड झाले आहे.
- चौकट
- नागपूर शहरात ११ हजार स्कूल बस आहे.
- तरीही दया आली नाही
एका स्कूल बस चालकाला मानकापूर येथे सोडून देण्यासाठी एका बँड पथकाची ६०० रुपयांची सवारी मिळाली होती. त्याने मोठ्या हिमतीने गाडी काढली. पण शहर वाहतूक पोलिसांनी त्याची गाडी थांबविली. मशीनचा धाक दाखवून त्याला चालान भरण्यास सांगितले. अन्यथा त्याला २०० रुपयांची मागणी केली. त्याने विनवणी केली साहेब ६०० रुपयांची सवारी आहे. त्यात २०० रुपयांचे डिझेल भरले. त्यात तुम्हाला २०० रुपये देणार, काय उरणार. साहेब रेशनचे गहू तांदूळ घेऊन कुटुंब पोसतो आहे. आमच्या ताटातला अर्धा घास तुम्ही हिसकावता आहे. पण पोलिसांना दया आली नाही. त्याने २०० रुपये पोलिसांना दिल्यानंतरच त्याला सोडण्यात आले, अशी खंत एका स्कूलबस चालकाने व्यक्त केली.
- १० महिन्यापासून स्कूल बस घरासमोरच उभी आहे. फायनान्सवर असल्यामुळे फायनान्स कंपन्यांकडून हप्ते भरण्यासाठी तगादा लावण्यात येत आहे. कुटुंब चालविण्यासाठी मिळेल ते काम करीत आहे. शाळाच बंद असल्याने हप्ते कुठून भरायचे हा प्रश्नच आहे. हे फायनान्स कंपन्यांना सांगितल्यावर ते ऐकायला तयार नाही. उपासमारीची वेळ आली आहे.
सचिन डबीर, स्कूलबस चालक
- सध्या घरचं उसनवारीवर सुरू आहे. हातात उत्पन्नाचे साधनच नाही. घरात पाच लोकांची जबाबदारी आहे. स्कूल व्हॅन फक्त शाळेसाठीच उपयोगाची आहे. प्रवासी वाहतूक करण्याला परवानगी नाही. हक्काची गाडी घरापुढे पडून असताना दुसऱ्याच्या गाडीवर चालक म्हणून काम करीत आहे.
अरुण दुपारे, स्कूलबस मालक
- फायनान्स कंपन्यांकडून होत असलेला त्रास कमी व्हावा म्हणून आम्ही जिल्हाधिकाऱ्यांकडून हप्ते भरण्यास शिथिलता मिळावी म्हणून पत्र आणले. फायनान्स कंपन्यांना ते पत्र दिले. पण फायनान्स कंपन्या ऐकायला तयार नाही. हप्ते भरा नाहीतर गाड्या उचलून नेऊ अशा धमक्या देऊन मानसिक त्रास देत आहे. एकाच जागेवर गाड्या उभ्या असल्याने गाडीच्या बॅटरी डाऊन झाल्या आहे. टायर खराब झाले आहे. त्यामुळे शाळा सुरू झाल्यातरी मेन्टेनन्सवर मोठा खर्च होणार आहे. शाळा सुरू झाल्या तरी फायनान्स कंपन्यांकडून किमान डिसेंबर २०२१ पर्यंत शिथिलता मिळाल्याशिवाय आमची परिस्थिती काही सुधारणार नाही.
प्रकाश देवतळे, सचिव, स्कूल बस चालक संघटना
- माझ्याकडे २५ ड्रायव्हर होते. शहरातील शाळांमध्ये आमच्या स्कूलबस चालत होत्या. १० महिन्यापासून शाळाच बंद असल्याने पगार देणे अवघड झाल्याने आम्हाला त्यांना काढावे लागले. शाळा कधी सुरू होईल, याची शक्यता नाही. मार्च महिन्यापासून एक रुपयाही आलेला नाही. बाहेर गाडी काढल्यास पोलीस त्रास देतात. गाड्या उभ्या असल्याने दुरुस्तीचा मोठा खर्च येणार आहे. त्यातच गाड्यांचे इन्शुरन्स, टॅक्स हे सुद्धा भरायचे आहे. कोरोनामुळे आलेली ही परिस्थिती लक्षात घेता आम्हाला इन्शुरन्स, टॅक्समध्ये सवलत द्यावी.
जुल्फेकार सिद्दीकी, स्कूल बस मालक