स्टार इन्व्हेस्टमेंटमधील घोटाळा उघड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 04:19 IST2021-01-13T04:19:57+5:302021-01-13T04:19:57+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर - अल्पावधीत रक्कम दामदुप्पट करून देण्याचे आमिष दाखवून अनेकांचे लाखो रुपये गोळा केल्यानंतर एका खासगी ...

स्टार इन्व्हेस्टमेंटमधील घोटाळा उघड
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर - अल्पावधीत रक्कम दामदुप्पट करून देण्याचे आमिष दाखवून अनेकांचे लाखो रुपये गोळा केल्यानंतर एका खासगी वित्तीय कंपनीच्या संचालकांनी गाशा गुंडाळला. संचालकांनी पळ काढल्यानंतर कंपनीचा आर्थिक घोटाळा उघड झाला. त्यानंतर हादरलेल्या गुंतवणूकदारांनी पोलिसांकडे धाव घेतली. याप्रकरणी शुक्रवारी कपिलनगर पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला. अनुराग ज्ञानचंद जैस (वय ४०) आणि शीतल अनुराग जैस (वय ३८), अशी आरोपी संचालक दाम्पत्याची नावे असून, ते दीक्षितनगरातील रहिवासी आहेत. त्यांनी गेल्या वर्षी कपिलनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत स्टार इन्व्हेस्टमेंट फर्म नामक कंपनी सुरू केली. तीन महिन्यात २० टक्के व्याज देण्याचे आमिष दाखवून त्यांनी अनेकांकडून लाखो रुपये गोळा केले. रमणा मारोतीनगरातील अमित दिनेश गुप्ता (वय ३०) आणि त्यांचा भाऊ त्याचप्रमाणे मित्र सूर्यप्रकाश गुप्ता आणि भूषण नांदेकर यांनीही आरोपींकडे १० ते १२ नोव्हेंबर २०२० या कालावधीत आरोपी अनुराग आणि त्याची पत्नी शीतल यांच्याकडे २२ लाख रुपये गुंतविले. तत्पूर्वीच आरोपींकडे रक्कम गुंतविणाऱ्यांनी तीन महिन्याचा कालावधी पूर्ण झाल्यामुळे आपली रक्कम मागण्यासाठी चकरा मारणे सुरू केले. आरोपीने कंपनीचा गाशा गुंडाळून पलायन केल्यामुळे फिर्यादी गुप्ता यांच्याही पायाखालची वाळू सरकली. त्यांनी चौकशी केल्यानंतर आरोपी गायब झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यामुळे त्यांनी शुक्रवारी कपिलनगर ठाण्यात आपल्या सहकाऱ्यांसह जाऊन तक्रार नोंदविली. पोलिसांनी आरोपी शीतल आणि अनुराग जैस या दोघांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला.
---
फसवणुकीचा आकडा कोट्यवधीच्या घरात
जैस दाम्पत्याने अशाप्रकारे अनेकांना फसविल्याची ओरड असून, त्यांनी गिळंकृत केलेल्या रकमेचा आकडा कोट्यवधीच्या घरात असल्याचे समजते.
---