सौर ऊर्जेचा होणार कार्यालयात वापर : जिल्ह्यात पहिलाच प्रयोग गणेश खवसे । लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : अपारंपरिक ऊर्जेचा सर्वत्र मोठ्या प्रमाणात वापर करण्याबाबत जनजागृती करण्यात येत आहे. त्यालाच अनुसरून .त्याचा वापरही सुरू झाला आहे. रस्त्या-रस्त्यांवर सौर दिव्यांची यंत्रणा बसवून प्रकाश पोहोचवण्याचे प्रयत्न देशपातळीवर सुरू आहेत. विजेचा पुरवठा अखंड सुरू राहण्याकरिता आणि ग्राहकांची मागणी पूर्ण करण्याकरिता अपारंपरिक ऊर्जेचे (सौर ऊर्जा, पवन ऊर्जा) प्रकल्प सर्वत्र उभारले जात आहेत. याच शृंखलेत सावनेर नगर परिषदही आली आहे. तेथे सध्या सौर पॅनल उभारून कार्यालयात वापरात येणाऱ्या विजेचे उत्पादन करण्यात येणार आहे. विशेष म्हणजे, अशाप्रकारचा हा नागपूर जिल्ह्यातील पहिलाच प्रयोग आहे. सावनेर नगरपालिकेला शासनाच्या महाराष्ट्र ऊर्जा विकास अभिकरणमार्फत २० किलोवॅट क्षमतेचे ऊर्जा संयंत्र मंजूर केले आहे. या प्रकल्पाची किंमत २३ लाख रुपये आहे. हे सौर ऊर्जा संयंत्र सावनेर नगर परिषदेच्या प्रशासकीय इमारतीवर ३५०० फूट जागेत उभारण्यात येत आहे. एकूण ८० पॅनल आहेत. यापासून अख्ख्या नगर परिषद प्रशासकीय इमारतीला म्हणजेच कार्यालयाला विद्युत पुरवठा होणार आहे. संगणक असो की पंखे, कूलर त्याद्वारे चालविले जाऊ शकते. तीन आठवड्यात हा प्रकल्प पूर्ण करण्याचे नियोजन असून सध्या पूर्णत्वाच्या दिशेने झेप घेतली आहे. अवघ्या काही दिवसांत हा प्रकल्प पूर्ण होऊन वीजनिर्मिती तेथून सुरू होणार आहे. ती वीज कार्यालयाला मिळणार आहे. शासनाची ही योजना असल्याने त्याचा नगर परिषदेवर कोणताच अतिरिक्त भार नाही. वीज देयक स्वरुपात जाणाऱ्या पैशाचीही बचत या माध्यमातून होणार आहे. प्रायोगिक तत्त्वावर सुरू असलेला हा प्रयोग पूर्ण सावनेरात राबविण्यात येणार असल्याचे नगराध्यक्ष रेखा मोवाडे, उपाध्यक्ष अॅड. अरविंद लोधी यांनी ‘लोकमत’ला सांगितले.
सावनेर नगर पालिका ‘लय भारी’
By admin | Updated: May 7, 2017 02:13 IST