सावनेर-कळमेश्वर नवीन राष्ट्रीय महामार्ग
By Admin | Updated: October 10, 2015 02:57 IST2015-10-10T02:57:53+5:302015-10-10T02:57:53+5:30
सावनेर-धापेवाडा-कळमेश्वर या रोडला राष्ट्रीय महामार्गाचा दर्जा देण्यात आला आहे. ५४७-ई असा क्रमांक असलेल्या या महामार्गाचा ...

सावनेर-कळमेश्वर नवीन राष्ट्रीय महामार्ग
हायकोर्टात माहिती : केंद्र शासन करणार बांधकाम
नागपूर : सावनेर-धापेवाडा-कळमेश्वर या रोडला राष्ट्रीय महामार्गाचा दर्जा देण्यात आला आहे. ५४७-ई असा क्रमांक असलेल्या या महामार्गाचा केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्रालयाच्या वतीने विकास करण्यात येणार आहे. केंद्र शासनाने मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात प्रतिज्ञापत्र सादर करून ही माहिती दिली आहे.
सावनेर रिंग रोडवरील २.५ किलोमीटरचा विकास रखडल्यामुळे समाजसेवक पन्नालाल गुराडीकर यांनी उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली आहे. याप्रकरणात केंद्र शासनाने प्रतिज्ञापत्र सादर केले. याचिकेवर शुक्रवारी न्यायमूर्तीद्वय भूषण धर्माधिकारी व प्रदीप देशमुख यांच्यासमक्ष सुनावणी झाली. दरम्यान, सावनेर रिंग रोडवरील २.५ किलोमीटरच्या खराब रोडचा सावनेर-धापेवाडा-कळमेश्वर या राष्ट्रीय महामार्गातच समावेश होणार असल्याचे केंद्र शासनाचे वकील अनीश कठाणे यांनी सांगितले. सावनेर रिंग रोडसाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने जमीन संपादित केली होती. यानंतर आठ किलोमीटरचा पट्टा केंद्र शासनाने स्वत:च्या ताब्यात घेऊन भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणमार्फत विकास केला. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अख्त्यारीतील २.५ किलोमीटरचा रोड नादुरुस्त आहे. या रोडच्या विकासाची जबाबदारी प्राधिकरणवर नाही असेही कठाणे यांनी स्पष्ट केले. ही बाब लक्षात घेता न्यायालयाने याचिकाकर्त्याला प्रत्युत्तर सादर करण्यासाठी एक आठवड्याचा वेळ देऊन सुनावणी तहकूब केली. याचिकाकर्त्यातर्फे अॅड. अक्षय नाईक यांनी बाजू मांडली. (प्रतिनिधी)