न्यायप्रविष्ट प्रकरणापेक्षा जीव वाचवणे अधिक महत्त्वाचे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2021 04:11 IST2021-02-09T04:11:01+5:302021-02-09T04:11:01+5:30

राकेश घानोडे नागपूर : सध्या संपूर्ण जग धोकादायक कोरोना संक्रमणाविरुद्ध लढा देत आहे. या काळात न्यायप्रविष्ट प्रकरणे घाईत निकाली ...

Saving lives is more important than a just case | न्यायप्रविष्ट प्रकरणापेक्षा जीव वाचवणे अधिक महत्त्वाचे

न्यायप्रविष्ट प्रकरणापेक्षा जीव वाचवणे अधिक महत्त्वाचे

राकेश घानोडे

नागपूर : सध्या संपूर्ण जग धोकादायक कोरोना संक्रमणाविरुद्ध लढा देत आहे. या काळात न्यायप्रविष्ट प्रकरणे घाईत निकाली काढण्यापेक्षा जीव वाचवणे अधिक महत्त्वाचे आहे. न्यायप्रविष्ट प्रकरणे इतर योग्य वेळी निकाली काढली जाऊ शकतात, असे मत मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचे न्यायमूर्ती विनय देशपांडे यांनी एका प्रकरणावरील निर्णयात व्यक्त केले आणि दिवाणी न्यायालयात प्रलंबित एका दाव्यावरील सुनावणी ४ मार्चपर्यंत पुढे ढकलली.

सध्याच्या परिस्थितीत आरोग्याची योग्य काळजी न घेतल्यास जीव गमवावा लागू शकतो. त्यानंतर या नुकसानीची भरपाई होऊ शकत नाही. तसेच, गेलेला जीव परत येऊ शकत नाही. त्यामुळे दिवाणी न्यायालयाने संबंधित दाव्यावरील सुनावणी केवळ एक दिवस पुढे ढकलण्यापूर्वी हे पैलू विचारात घेणे आवश्यक होते, असेही उच्च न्यायालय पुढे म्हणाले.

इंडो रामा सिन्थेटिक कंपनीने बुटीबोरी सीईपीटी कंपनी व इतर दोघांविरुद्ध पैसे वसुली, मनाईहुकूम इत्यादीकरिता वरिष्ठ स्तर दिवाणी न्यायालयात दावा दाखल केला आहे. त्या दाव्यावर २५ जानेवारी २०२१ रोजी सुनावणी होती. परंतु, एका ७४ वर्षीय ज्येष्ठ वकिलाला कोरोनाची लागण झाल्यामुळे बुटीबोरी सीईपीटी कंपनीने दाव्यावरील सुनावणी तीन आठवडे तहकूब करण्याची विनंती केली होती. दिवाणी न्यायालयाने मात्र, हा दावा तातडीने निकाली काढणे आवश्यक असल्याचे निरीक्षण नोंदवून सुनावणी केवळ एक दिवसाकरिता पुढे ढकलली. त्याविरुद्ध बुटीबोरी सीईपीटी कंपनीने उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. उच्च न्यायालयाने ती याचिका मंजूर केली व वरीलप्रमाणे मत नोंदवून दिवाणी न्यायालयाचा वादग्रस्त आदेश रद्द केला. तसेच, संबंधित दाव्यावर येत्या ४ मार्च रोजी पुढील सुनावणी घेण्याचे निर्देश दिले.

Web Title: Saving lives is more important than a just case

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.