सावरकरांच्या विचारांनीच देशाचा विकास शक्य
By Admin | Updated: June 6, 2014 00:58 IST2014-06-06T00:58:06+5:302014-06-06T00:58:06+5:30
मी तटस्थपणे अनेक महापुरुषांचे चरित्र वाचले. ही माणसे खरेच खूप मोठी होती पण त्यांचे काम मला सार्वत्रिक वाटले नाही. त्यांनी केलेले काम मोठे होते पण ते तत्कालीन परिस्थितीवर नियंत्रण मिळविण्यासाठी

सावरकरांच्या विचारांनीच देशाचा विकास शक्य
अभिनेता शरद पोंक्षे : कलादालन फाऊंडेशन व हेल्पिंग पीपलचा उपक्रम
नागपूर : मी तटस्थपणे अनेक महापुरुषांचे चरित्र वाचले. ही माणसे खरेच खूप मोठी होती पण त्यांचे काम मला सार्वत्रिक वाटले नाही. त्यांनी केलेले काम मोठे होते पण ते तत्कालीन परिस्थितीवर नियंत्रण मिळविण्यासाठी केले होते. या महापुरुषांचे चरित्र समजून घेताना स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या विचारांनी मात्र मनावर गारुड निर्माण केले. सद्सद्विवेकबुद्धी जागृत असलेल्या प्रत्येक माणसाच्या मनावर त्यांच्या विचारांचे गारुड निर्माण होणे स्वाभाविक आहे. कारण त्यांचे विचार आजचे, आताचे आणि २0१४ चे वाटतात. सावरकरांच्या विचारांवर आपण अमल केला नाही, त्याचे दुष्परिणाम आपण भोगतो आहोत. सावरकरांच्या विचारांनीच आजही देशाचा विकास शक्य असल्याचे ठाम मत अभिनेता शरद पोंक्षे यांनी व्यक्त केले.
कलादालन फाऊंडेशन आणि हेल्पिंग पीपलच्यावतीने स्वा. सावरकर दर्शन या विषयावर त्यांच्या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी शरद पोंक्षे बोलत होते. पोंक्षे म्हणाले, आपल्या शालेय अभ्यासक्रमात योग्य इतिहासच शिकवला जात नाही. मुलांच्या अभ्यासक्रमात आपल्या क्रांतिकारकांच्या जाज्वल्य देशप्रेमाने भारलेला इतिहासच नाही. त्यांना आपण फ्रेंच राज्यक्रांती आणि रशियन राज्यक्रांती तसेच दुसर्या महायुद्धाची कारणे शिकवितो. त्यामुळे सारा घोळ निर्माण झाला आहे.
या देशासाठी लढलेल्या क्रांतिकारकांचा विचार समजवून सांगितल्या जात नसल्यामुळे या पिढीला त्यांच्या कर्तृत्वाचा अभिमान वाटत नाही. आपण स्वतंत्र देशात जन्माला आलो पण या स्वातंत्र्यासाठी आमच्या पूर्वजांनी काय किंमत मोजली, याची जाणीवच आम्हाला नसल्याने आम्ही रसातळाला जातो आहोत. पण यंदा प्रथमच भारतीय जनतेचे डोळे उघडल्याचा आनंद वाटतो, असे ते म्हणाले. सावरकरांचा विचार या देशाला ५0 वर्षांंंंनी पटला. सावरकरांनाही हेच वाटत होते. एका ब्रिटिश अधिकार्याने सावरकरांना म्हटले, तुम्ही चुकीच्या देशात चुकीच्या वेळी जन्माला आलात. अन्यथा लोकांनी तुमच्या विचारांवर अमल केला असता. इंग्रजांनी आपल्या देशाला गुलाम करण्यासाठी मेकॉलेला शिक्षणपद्धती तयार करायला लावली.
यामुळे भारतीय संस्कृतीवरच आघात करण्याचा त्यांचा प्रयत्न यशस्वी झाला. आपल्या संस्कृतीचे संचित असलेल्या संस्कृत भाषेचा प्रवाह त्यांनी थांबविला. याविरोधात सावरकरांनी मोठे कार्य केले. याप्रसंगी मनीष गायकवाड, शेखर रोकडे, माधवी पांडे, श्रद्धा घरोटे प्रामुख्याने उपस्थित होते. (प्रतिनिधी)