सात्त्विकचे अमोल ढाके गजाआड

By Admin | Updated: December 8, 2014 00:58 IST2014-12-08T00:58:18+5:302014-12-08T00:58:18+5:30

शेकडो गुंतवणूकदारांना कोट्यवधींचा गंडा घालणारा सात्त्विक ग्रुप आॅफ इन्व्हेस्टमेंट कंपनीचा संचालक अमोल ढाके याला आज अंबाझरी पोलिसांनी एका मंदिरातून नाट्यमयरीत्या अटक केली.

Sathvik's Amol Dhama Ghazaad | सात्त्विकचे अमोल ढाके गजाआड

सात्त्विकचे अमोल ढाके गजाआड

मंदिरातून नाट्यमय अटक : साथीदारांसह पसार
नागपूर : शेकडो गुंतवणूकदारांना कोट्यवधींचा गंडा घालणारा सात्त्विक ग्रुप आॅफ इन्व्हेस्टमेंट कंपनीचा संचालक अमोल ढाके याला आज अंबाझरी पोलिसांनी एका मंदिरातून नाट्यमयरीत्या अटक केली.
अमोल ढाके याने डिसेंबर २००५ मध्ये अमरावती रोडवर पुराणिक ले-आऊट (भरतनगर) मध्ये सात्त्विक ग्रुप आॅफ इन्व्हेस्टमेंट कंपनीची स्थापना केली. आकर्षक व्याज देणाऱ्या अनेक योजनांचे मृगजळ दाखवून ठेवीदारांना अल्पावधीत मोठ्या परताव्याचे ढाके आमिष दाखवत होता. तिमाही, सहामाही आणि बारामाही योजनांसोबतच ४२ महिन्यांत दुप्पट रक्कम देण्याचेही तो आणि त्याचे साथीदार गुंतवणूकदारांना आमिष दाखवत होते. यामुळे शेकडो नागरिकांनी आपली आयुष्यभराची कमाई ढाकेच्या सात्त्विक कंपनीत गुंतवली. प्रारंभी काही ठेवीदारांना व्याजाची अंशत: रक्कम मिळाली. मात्र, साथीदारांनी हीच रक्कम वेगळ्या योजनेत गुंतवण्यासाठी संबंधित ठेवीदाराला प्रवृत्त केले. २०१३ पर्यंत त्याने अशाप्रकारे कोट्यवधी रुपये गोळा केले. २०१३ च्या प्रारंभीपासूनच त्याने ठेवीदारांना टाळणे सुरू केले. वेगवेगळी कारणे सांगून तो रक्कम परत करण्याचे आश्वासन देत होता. त्याने दिलेले चेक वटत नसल्यामुळे ठेवीदारांचा रोष वाढला. त्यानंतर ठेवीदारांनी पोलिसांकडे तक्रार करण्याची भाषा सुरू केली. तो आणि त्याचे समर्थक प्रत्येक वेळी पुढच्या महिन्यात रक्कम देतो, असे सांगायचे. दोन महिन्यांपासून ढाके आणि त्याचे साथीदार ‘नॉट रिचेबल‘ असल्यामुळे ठेवीदारांपैकी संजय प्रकाशराव काशीकर (वय ५०) यांनी २१ सप्टेंबरला अंबाझरी पोलिसांकडे तक्रार नोंदवली. पोलिसांनी प्रदीर्घ चौकशी केल्यानंतर अमोल ढाके आणि प्रीती ढाके, महेंद्र कोहाड, अतुल दीक्षित, संदीप महाजन तसेच मोहन जोशी यांच्याविरुद्ध ४ डिसेंबरला गुन्हे दाखल केले. प्रसारमाध्यमातून या घडामोडीची माहिती कळताच तक्रारकर्त्यांची पोलिसांकडे वर्दळ वाढली.
ढाकेला सोडून द्या...
ढाकेपाठोपाठ मोठ्या संख्येत ठेवीदार पोलीस ठाण्यासमोर पोहचले. त्यातील दहा बारा समर्थकांनी ठाणेदार कातकाडे यांना ‘ढाकेला महिनाभराची सवलत द्या. सर्वांना पैसे परत मिळणार आहे. आमचेही पैसे आहे. त्यामुळे त्याला आता सोडून द्या, पाहिजे तर महिनाभरानंतर पुन्हा अटक करा‘, अशी विनंती या सर्वांनी केली. ठाणेदार कातकाडे यांनी मात्र ती धुडकावून लावली. अशा प्रकारचा गुन्हा दाखल असलेल्या आरोपीला अटक केल्यानंतर त्याची लगेच सुटका करण्याचा अधिकार पोलिसांना नसल्याचे त्यांनी सांगितले.

Web Title: Sathvik's Amol Dhama Ghazaad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.