तामिळनाडूचे गाव अन् नागपूरचे विद्यार्थी! स्वप्नांना बळ मिळाले, तयार केलेले सॅटेलाइट अवकाशात झेपावले
By मंगेश व्यवहारे | Updated: February 20, 2023 19:54 IST2023-02-20T19:18:50+5:302023-02-20T19:54:54+5:30
डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम सॅटेलाइन लाँच मिशन-२०२३ अंतर्गत तामिळनाडूमध्ये झाला उपक्रम

तामिळनाडूचे गाव अन् नागपूरचे विद्यार्थी! स्वप्नांना बळ मिळाले, तयार केलेले सॅटेलाइट अवकाशात झेपावले
नागपूर : मार्टिन फाउंडेशन, डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम इंटरनॅशनल फाउंडेशन व स्पेस झोन इंडियाच्या समन्वयाने संयुक्तपणे राबविण्यात आलेल्या डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम सॅटेलाइन लाँच मिशन-२०२३ तामिळनाडूच्या चेंगलपट्टू जिल्ह्यातील पट्टीपोलम गावातून लाँच करण्यात आले. एका रॉकेटच्या साहाय्याने १५० पिको सॅटेलाइट अवकाशात सोडण्यात आले. यात नागपूर महापालिकेच्या विद्यार्थ्यांनी बनविलेल्या १० पिको सॅटेलाइटचा समावेश होता. विशेष म्हणजे, या लाँचिंगच्या वेळी महापालिकेचे विद्यार्थी व शिक्षक उपस्थित होते.
डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी हाऊस ऑफ कलामतर्फे डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम सॅटेलाइट लॉन्च व्हेईकल मिशन -२०२३ चे आयोजन करण्यात आले होते. या मिशनअंतर्गत देशभरातील विद्यार्थ्यांनी तयार केलेले १५० सॅटेलाइट रॉकेटद्वारे अवकाशात सोडण्यापर्यंतच्या या प्रवासात दोन महिन्यांचा कालावधी लागला. या दीडशे सॅटेलाइटमध्ये नागपूर महापालिकेच्या विद्यार्थ्यांचे १० सॅटेलाइट होते. त्यासाठी विद्यार्थ्यांना ऑनलाइन प्रशिक्षण देण्यात आले. सॅटेलाइट बनविण्यासाठी नागपुरात कार्यशाळा घेण्यात आली.
या कार्यशाळेत बनविण्यात आलेले सॅटेलाइट रविवारी लॉचिंगद्वारे अवकाशात सोडण्यात आले. वातावरणातील विविध घटकांचा अभ्यास या उपग्रहांच्या माध्यमातून करण्यात येईल. रविवारी झालेल्या कार्यक्रमात नागपूर महापालिकेच्या शाळांमधील ७ विद्यार्थी आणि ४ शिक्षक उपस्थित होते. या कार्यक्रमाला तामिळनाडूच्या राज्यपाल टी. सौंदराराजन उपस्थित असल्याची माहिती महापालिकेच्या विज्ञान शिक्षिका दीप्ती बिस्ट यांनी दिली.