सरसंघचालक गडकरींच्या घरी

By Admin | Updated: August 3, 2015 02:55 IST2015-08-03T02:55:11+5:302015-08-03T02:55:11+5:30

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांच्याशी चर्चा करायची असेल तर सामान्यत: संघ मुख्यालयातच त्यांची भेट घ्यावी लागते.

Sarsanghchalak Gadkari's house | सरसंघचालक गडकरींच्या घरी

सरसंघचालक गडकरींच्या घरी

बंदद्वार झाली चर्चा :
भेटीचे कारण स्पष्ट नाही
नागपूर : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांच्याशी चर्चा करायची असेल तर सामान्यत: संघ मुख्यालयातच त्यांची भेट घ्यावी लागते. परंतु शनिवारी रात्री सरसंघचालकांनी सर्वांनाच बुचकळ्यात टाकले. केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या निवासस्थानी जाऊन सरसंघचालकांनी त्यांच्याशी चर्चा केली. भाजपचे ज्येष्ठ नेते डॉ. सुब्रमण्यम स्वामी यांनी गडकरी यांना काम करू दिले जात नसल्याचे वक्तव्य नुकतेच केले होते. यानंतर आठवडाभरातच ही भेट झाल्यामुळे विविध कयास लावले जात आहेत. दरम्यान, या भेटीबाबत अतिशय गुप्तता राखण्यात येत आहे.
शनिवारी रात्री ९ च्या सुमारास सरसंघचालक गडकरी यांच्या महाल येथील वाड्यावर पोहोचले. गडकरींना काही दिवसांअगोदरच नात झाली आहे. याबद्दल सर्वात प्रथम तर त्यांनी गडकरी व त्यांच्या कुटुंबीयांना शुभेच्छा दिल्या व नातीची ख्यालीखुशाली विचारली. त्यानंतर दोघांमध्ये सुमारे पाऊण तास बंदद्वार चर्चा झाली. सुमारे दीड तास डॉ. भागवत हे नितीन गडकरी यांच्या निवासस्थानी होते. या भेटीत नेमकी कुठल्या मुद्यांवर चर्चा झाली हे कळू शकले नसले तरी भाजपातील अंतर्गत राजकारण, व्यापमं घोटाळा-ललित मोदी प्रकरण व पंजाबमधील दहशतवादी हल्ला याबाबतीत विरोधकांकडून घेण्यात आलेली आक्रमक भूमिका या पार्श्वभूमीवर या भेटीला महत्त्व आले आहे. याबाबत संघ परिवाराकडून मौन साधण्यात आले आहे. (प्रतिनिधी)
‘आयआयएम’च्या संचालकांनी घेतली गडकरींची भेट
दरम्यान, मागील आठवड्यात पत्राद्वारे माफी मागितल्यानंतर ‘आयआयएम-अहमदाबाद’चे संचालक प्रा. आशिष नंदा यांनी नितीन गडकरी यांची प्रत्यक्ष भेट घेतली. महाराष्ट्रातील पहिलेवहिले ‘आयआयएम’ नागपुरात यावे यासाठी गडकरी यांनी पुढाकार घेतला होता. परंतु ‘आयआयएम-एन’च्या (इंडियन इन्स्टिट्यूट आॅफ मॅनेजमेंट-नागपूर)उद्घाटनाच्या कार्यक्रमाचे निमंत्रण त्यांना ‘प्रोटोकॉल’नुसार प्रत्यक्षपणे पोहोचलेच नाही. त्यामुळे गडकरी कार्यक्रमाला आलेच नव्हते. यासंदर्भात प्रा. आशिष नंदा यांनी गडकरी यांची पत्र लिहून माफी मागितली होती. यानंतर प्रा. नंदा यांनी गडकरी यांची त्यांच्या निवासस्थानी प्रत्यक्ष भेट घेतली व झालेल्या प्रकाराबाबत माफी मागितली. यावेळी प्रा. नंदा यांनी गडकरी यांना ‘आयआयएम’बाबत माहिती दिली. गडकरी यांनी ‘आयआयएम-एन’ला भेट द्यावी, अशी विनंतीदेखील नंदा यांनी केली आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली.

Web Title: Sarsanghchalak Gadkari's house

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.