लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : संस्कृत ही ज्ञानभाषा आहे. शास्त्राची भाषा आहे. त्यावर संशाेधन झाले पाहिजे. त्याला राजाश्रय मिळाला पाहिजे. तो मिळत आहे. संशोधनही होत आहे. पण, तिला लोकाश्रयसुद्धा मिळावा. ती व्यवहारात आली पाहिजे. ती लोकभाषा व्हावी, बोलचालीची भाषा व्हावी, असे आवाहन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डाॅ. मोहन भागवत यांनी येथे केले.
कविकुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठाच्या वारंगा येथील डाॅ. बळीराम हेडगेवार आंतरराष्ट्रीय शैक्षणिक भवनाचे लोकार्पण, डाॅ. केशव बळीराम हेडगेवार आंतरराष्ट्रीय गुरुकुलाचे उद्घाटन आणि डाॅ. केशव बळीराम हेडगेवार मुला-मुलींच्या वसतिगृहाचे भूमिपूजन शुक्रवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांतदादा पाटील, अर्थ राज्यमंत्री ॲड. आशिष जयस्वाल प्रमुख अतिथी होते. संस्कृत विद्यापीठाचे माजी कुलगुरू डाॅ. पंकज चांदे, प्रा. उमा वैद्य, कुलसचिव डाॅ. देवानंद शुक्ल प्रामुख्याने उपस्थित होते. डाॅ. भागवत म्हणाले, जसा समाजाचा भाव असतो. तशी समाजाची भाषा असते. पाश्चिमात्य लोक ग्लोबल मार्केट म्हणतात, परंतु आपण ‘वसुधैव कुटुंबकम्’ असे म्हणतो. ही भाषा आपल्या भावातून आलेली आहे. आपल्या परंपरेतून हा भाव आला आहे. हा भाव संस्कृतमधून विकसित झाला आहे. जगातील अनेक भाषांचे मूळ संस्कृत आहे. भारतातील सर्व भाषांची जननी आहे. ती व्यवहारात आली पाहिजे. संस्कृत जाणणे म्हणणे भारत जाणणे होय, तेव्हा ती बोलीभाषा व्हावी, असे त्यांनी स्पष्ट केले. संचालन प्रा. पराग जोशी यांनी केले. तर प्रा. कृष्णकुमार पांडेय यांनी आभार मानले.
संस्कृत विद्यापीठात होणार आंतरराष्ट्रीय दर्जाच्या पायाभूत सुविधा : मुख्यमंत्री फडणवीसकविकुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठात आंतरराष्ट्रीय दर्जाच्या पायाभूत सुविधांचा विकास होईल. त्याच्या मास्टर प्लॅनबाबत पुढच्या आठवड्यात बैठक होईल. आवश्यक निधी दिला जाईल आणि विकासकामांसाठी कालमर्यादाही निश्चित केली जाईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी बोलताना स्पष्ट केले. मुख्यमंत्र्यांची कबुली, व्यक्त केली खंत.
संस्कृत भाषा ही ज्ञानाची गुरुकिल्ली आहे. मी चांगल्या पद्धतीने संस्कृत शिकू शकलो नाही, अशी कबुली देत मोठ्या ज्ञानापासून मी वंचित राहिलो, अशी खंतही मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी व्यक्त केली. माझी आई संस्कृतमध्ये एम. ए. आहे. संस्कृत कधीही शिकता येते. मीसुद्धा शिकण्याचा प्रयत्न करेन. संस्कृत भाषा अनेकांना शिकता यावी, यासाठी माझेही प्रयत्न राहतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.