लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त महापालिकेच्या दहाही झोनमध्ये शनिवारी स्वच्छता रॅली काढण्यात आली.
रॅलीद्वारे स्वच्छतेसंबंधी जनजागृतीसह ‘स्वच्छ सर्वेक्षण २०२१’ मध्ये नागरिकांनी सक्रिय सहभागी होऊन आपल्या शहराचा दर्जा वाढविण्यात योगदान देण्याचे आवाहन करण्यात आले. आपले शहर स्वच्छ ठेवण्यासाठी नागरिकांच्या लहानसहान कृती महत्त्वाच्या आहेत. घराघरांतून ओला आणि सुका वेगवेगळा संकलित करून द्यावा. याशिवाय शासनाकडून प्रतिबंधित करण्यात आलेल्या सिंगल यूज प्लास्टीकचा वापर टाळणे. शहर स्वच्छतेसंबंधी नागरिकांच्या तक्रारीसाठी मनपाद्वारे स्वच्छता ॲपची निर्मिती करण्यात आले आहे त्याचा वापर करण्याचे आवाहनही रॅलीमधून करण्यात आले.
मनपाच्या लक्ष्मीनगर, धरमपेठ, हनुमाननगर, धंतोली, नेहरूनगर, गांधीबाग, सतरंजीपुरा, लकडगंज, आसीनगर आणि मंगळवारी झोनमधून स्वच्छता रॅली काढण्यात आली. सहायक आयुक्त गणेश राठोड, प्रकाश वराडे, सुषमा मांडगे, किरण बगडे, हरीश राऊत, अशोक पाटील, विजय हुमने, साधना पाटील यांनी संबंधित झोनच्या रॅलीचे नेतृत्व केले.
धरमपेठ झोनमध्ये गोकुलपेठ, तेलंखेडी, मरारटोली, संजय नगर सिंगल लाइन, पांढराबोडी, बाजी प्रभू नगर, रामनगर आदी भागांत स्वच्छता रॅली काढण्यात आली. धरमपेठ झोनचे सहायक आयुक्त प्रकाश वराडे यांनी स्वच्छता रॅलीचे नेतृत्व केले. रॅलीमध्ये स्वयंसेवक, उपद्रव शोध पथकाचे धनंजय कटरे, मंगल पटले, महेंद्र ठाकरे, शशांक पाटील, वामन गायधने यांच्यासह मनपाचे स्वच्छता कर्मचारी सहभागी होते.