मुख्यमंत्र्यांचे विश्वासू संदीप जोशींना संयमाचे फळ, संघ शाखेपासून सामाजिक कार्याची सुरुवात

By योगेश पांडे | Updated: March 16, 2025 13:29 IST2025-03-16T13:27:26+5:302025-03-16T13:29:49+5:30

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे विश्वासू असलेले माजी महापौर संदीप जोशी यांना भाजपकडून विधानपरिषदेची उमेदवारी घोषित करण्यात आली आहे.

Sandeep Joshi declared BJP's candidate for Legislative Council | मुख्यमंत्र्यांचे विश्वासू संदीप जोशींना संयमाचे फळ, संघ शाखेपासून सामाजिक कार्याची सुरुवात

मुख्यमंत्र्यांचे विश्वासू संदीप जोशींना संयमाचे फळ, संघ शाखेपासून सामाजिक कार्याची सुरुवात

नागपूर : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे विश्वासू असलेले माजी महापौर संदीप जोशी यांना भाजपकडून विधानपरिषदेची उमेदवारी घोषित करण्यात आली आहे. संघ स्वयंसेवक ते महापौर अशी मजल मारणाऱ्या जोशी यांचा पश्चिम नागपूर व दक्षिण-पश्चिम नागपुरात दांडगा जनसंपर्क आहे. विधानसभा निवडणूकीत त्यांना तिकीट मिळावे यासाठी त्यांच्या समर्थकांनी जोरदार किल्ला लढविला होता. मात्र जोशी यांनी संयम बाळगत पक्षाच्या हितासाठीच काम केले. त्याचेच फळ त्यांना विधानपरिषद उमेदवारीच्या रुपात मिळाले आहे.

संघ स्वयंसेवक म्हणून सामाजिक कार्याची सुरुवात करणारे जोशी २००२ साली मनपात प्रथमच नगरसेवक म्हणून निवडून गेले. त्यानंतर जोशी यांनी कधीही मागे वळून पाहिले नाही. गणेशोत्सव, क्रीडास्पर्धा, विविध सांस्कृतिक कार्यक्रम इत्यादी सामाजिक उपक्रमांच्या माध्यमातून त्यांनी राजकीय चौकटीबाहेर निघत स्वत:ची वेगळी ओळख प्रस्थापित केली. २०१० मध्ये त्यांना भाजपाने मनपाच्या स्थायी समितीच्या अध्यक्षपदाची जबाबदारी दिली. याच कालावधीत त्यांनी नागपूर सुधार प्रन्यासमध्ये विश्वस्त म्हणूनदेखील काम केले. जलप्रदाय विभागाचे सभापती म्हणून त्यांच्या पुढाकारामुळे मनपाकडे कोट्यवधी रुपयांची थकबाकी जमा झाली. २०१२ व २०१७ च्या निवडणूकांतदेखील संदीप जोशी यांनाच मतदारांनी कौल दिला व त्यांनी विजेतेपदाचा चौकार मारला.

महाराष्ट्र राज्य लघु उद्योग विकास महामंडळाचे अध्यक्ष ही जबाबदारीदेखील त्यांनी सांभाळली. कोरोना काळात महापौर असताना संदीप जोशी आणि तत्कालिन मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांच्यातील वाद चांगलाच गाजला होता. देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री असताना जोशी यांच्याकडे त्यांच्या कार्यालयाचे मानद सचिव म्हणून जबाबदारी होती. २०२४ साली विधानसभेची निवडणूक घोषित झाल्यावर पश्चिम नागपुरातून त्यांना उमेदवारी मिळावी यासाठी त्यांचे समर्थक रस्त्यावर उतरले होते. मात्र जोशी यांनी त्यांना शांत करत पक्षासाठी काम करण्याचे आवाहन केले होते. जोशी यांची राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक व क्रीडा वर्तुळातील संपर्क ही दांडगी बाजू आहे. ‘व्हिजन नेक्स्ट फाऊंडेशन’, ‘युवा झेप प्रतिष्ठान’, ‘दीनदयाल रुग्ण सेवा प्रकल्प’, ‘प्रा.राजेंद्रसिंह सायन्स एक्स्प्लोरेटरी सेंटर’, ऋणाधार चॅरिटेबल सोसायटी इत्यादी संस्थांच्या माध्यमातून त्यांनी सामाजिक क्षेत्रात मौलिक कार्य केले आहे. या सर्व बाबी लक्षात घेता पक्षाने अखेर त्यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले.

२०२० चा प्रयत्न राहिला अधुरा

२०२० साली विधानपरिषदेच्या पदवीधर मतदारसंघातून संदीप जोशी यांना उमेदवारी मिळाली होती. कॉंग्रेसचे अभिजीत वंजारी यांच्याशी त्यांची लढत होती. मात्र भाजपचा बालेकिल्ला असलेल्या या मतदारसंघात जोशी यांना पराभवाचा सामना करावा लागला होता.

एक असा देखील विक्रम

स्थायी समितीचे अध्यक्ष म्हणून संदीप जोशी यांनी नागपूर महानगरपालिकेत एक वेगळा विक्रम प्रस्थापित केला. त्यांचा पहिला कार्यकाळ संपल्यानंतर २०११-१२ मध्ये त्यांना परत स्थायी समितीच्या अध्यक्षपदी कायम ठेवण्यात आले. महापालिकेच्या ५२ वर्षांच्या इतिहासात सलग दुसऱ्यांदा स्थायी समितीच्या अध्यक्षपदी विराजमान होणारे ते पहिलेच नगरसेवक ठरले.

Web Title: Sandeep Joshi declared BJP's candidate for Legislative Council

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.