कमलेश वानखेडेलोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयातील प्रकरणावरून मंगेशकर कुटुंबीयांवर केलेल्या आरोपांवरून भाजपचे आ. संदीप जोशी हे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आ. विजय वडेट्टीवार यांच्याशी भिडले आहेत. जोशी यांच्यासह नागपुरातील कलावतींनी एकत्र येत वडेट्टीवार यांना काही प्रश्न विचारत त्याची उत्तरे लोकांसमोर द्यावी, अन्यथा आरोप थांबवावे, असे आव्हान दिले आहे.
आ. संदीप जोशी यांच्यासह ज्येष्ठ गायक अमित खोब्रागडे, नागपुरातील कलासाधक प्रफुल्ल माटेगांवकर तसेच ज्येष्ठ तबलावादक सचिन ढोमणे आदींनी प्रसिद्धीला दिलेल्या म्हटले आहे की, वडेट्टीवार यांनी केलेल्या आरोपाने देशातील प्रत्येक नागरिकांच्या मनात चीड निर्माण केली आहे. कलाप्रेमी, कला उपासक दुखावले गेले आहेत. लता मंगेशकर ह्या ‘भारतरत्न’ आहेत. पद्मभूषण, पद्मविभूषण, दादासाहेब फाळके पुरस्कार, महाराष्ट्र भूषण अशा देशातील व राज्यातील सर्वोच्च पुरस्काराने त्या सन्मानित आहेत. मंगेशकर कुटुंबीयातील आशा भोसले, पंडित हृदयनाथ मंगेशकर, उषा मंगेशकर हे सदस्यही सर्वोच्च पुरस्कारांनी सन्मानित आहेत. वडेट्टीवार यांच्या परिवारात कोणाला तरी या दर्जाचा एखादा अवॉर्ड मिळाला असेल तर तो त्यांनी जाहीर करावा. मंगेशकर कुटुंबीयांकडे असलेली संपत्ती ही त्यांनी त्यांच्या कलासाधनेतून कमावलेली आहे. त्यांनी आपल्या कमावलेल्या नावावर पुण्यात अत्याधुनिक सोयींनी सुसज्ज रुग्णालय उभारण्यासाठी देणगी गोळा केल्या. सदर रुग्णालय ट्रस्ट मार्फत संचालित आहेत. रुग्णालयाच्या माध्यमातून ट्रस्टची जी कमाई होते त्यात मंगेशकर कुटुंबीय कुठल्याही पद्धतीने लाभार्थी नाहीत.
‘मंगेशकर कुटुंबीय ही लुटारुंची टोळी आहे. त्यांच्यापैकी कुणी कधी दान केल्याचे पाहिले आहे का, असे वडेट्टीवार जर म्हणत असेल तर वडेट्टीवारांच्या परिवाराने या लुटारुंच्या टोळीपेक्षा केलेले दान जास्त असेल तर जनतेसमोर आणावे. विदर्भातील गोसेखुर्द नावाने ओळखला जाणाऱ्या प्रकल्पाचे नाव माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या नावाने अर्थात ‘इंदिरासागर’ असे आहे. या धरणाच्या कामात झालेल्या भ्रष्टाचारासाठी मग संपूर्ण गांधी कुटुंबीयांना दोषी धरायचे का, असे अनेक प्रश्न वडेट्टीवारांसमोर त्यांनी उपस्थित केले आहेत.
वडेट्टीवार हे मंगेशकर कुटुंबीयांवर करत असलेले आरोप नैराश्यातून, प्रक्षोभक वक्तव्याने स्वत:कडे लक्ष वेधून घेण्याच्या कुरघोडीतून आणि पक्षात डळमळीत असलेले पद सावरण्याच्या हेतूने करीत आहेत, अशी टीकाही त्यांनी केली आहे.