Sanctuaries, tourist destinations waiting for tourists; Tadoba at 50-60 percent | अभयारण्य, पर्यटन स्थळांना पर्यटकांची प्रतीक्षा; ताडोबा ५०-६० टक्क्यांवर

अभयारण्य, पर्यटन स्थळांना पर्यटकांची प्रतीक्षा; ताडोबा ५०-६० टक्क्यांवर

निशांत वानखेडे
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : सहा महिन्याच्या बंदिवासानंतर अभयारण्यांचे गेट सुरू करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला खरा पण या स्थळांवर पर्यटकांची प्रतीक्षा कायम आहे. कोरोनाच्या कंटाळवाण्या स्थितीतून बाहेर येत प्राणिदर्शनासाठी नागरिकांचे पाय वळतील, अशी अपेक्षा होती पण भीती कायम आहे. ताडोबा येथे पहिल्याच आठवड्यात लोकांची गर्दी उसळली होती पण नंतर हा प्रवाह काहपसा कमी झाला. मात्र इतर ठिकाणचे सुनेपण तर अद्याप संपलेले नाही.

राज्य शासनाने १ ऑक्टोबरपासून सर्व अभयारण्ये, पर्यटन स्थळे पर्यटकांसाठी सुरू करण्याची परवानगी दिली. वनविभागाने लोकांना संसगार्चा धोका टाळण्यासाठी नियमांची कडेकोट व्यवस्था उभारली. पहिल्याच आठवड्यात ताडोबा अंधारी व्याघ्र अभयारण्य पर्यटकांनी फुलले होते. पहिले तीन दिवस चांगलीच गर्दी उसळली. वनविभागाच्या माहितीनुसार, पहिल्याच दिवशी ३२० पर्यटकांनी हजेरी लावली व ८० सफारी वाहन (जिप्सी) अभयारण्यात फिरले. पुढचे तीन-चार दिवस ही गर्दी कायम होती. विकएंडला पुन्हा पर्यटकांच्या उपस्थितीने उत्साह वाढला. पर्यटकांचा सकारात्मक व सुरक्षित प्रतिसाद मिळत असून पहिल्या आठवड्यातील बुकिंग ६०-७० टक्क्यापर्यंत वाढल्याचे ताडोबाचे फिल्ड अधिकारी जितेंद्र रामगावकर यांनी सांगितले. त्यामुळे ताडोबातील वाघांची भुरळ पर्यटकांमध्ये आजही कायम आहे, असे चित्र होते.

मात्र दुसऱ्या आठवड्यापासून गर्दी ओसरत असल्याची स्थिती आहे. कदाचित आर्थिक अडचणी व स्थितीचा विचार करीत सध्या पर्यटकही दूर असल्याचे सांगितले जात आहे. दुसरीकडे पेंच व बोर अभयारण्यात मात्र हवा तसा प्रतिसाद मिळाला नाही. जाणकारांच्या मते, हिवाळ्याची चाहूल लागताच पर्यटनासाठी लोकांमध्ये उत्साह संचारलेला असतो. विशेष म्हणजे विदेशी पर्यटकांची गर्दी वाढलेली असते. यावेळी मात्र विदेशी पर्यटकांची उपस्थिती शून्य आहे. आता १० वषार्खालील मुले व ६५ वर्षावरील ज्येष्ठांना परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळे पर्यटनावर अवलंबून असलेल्या प्रत्येकाला स्थिती सुधारण्याची आशा आहे.

सहा महिन्यात तीन कोटींचे नुकसान
मार्च ते जून महिना पर्यटनासाठी अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. मात्र कोरोना संक्रमणामुळे १८ मार्चपासून अभयारण्य पर्यटकांसाठी बंद झाले व संपूर्ण सिझन वाया गेला. या काळात विभागाचे तीन कोटींच्यावर नुकसान झाल्याचे सांगण्यात येत आहे. याशिवाय गाईड, सफारी वाहनचालक, रिसॉर्ट मालक यांचाही रोजगार व शेकडो लोकांचा व्यवसाय बुडाला होता. पर्यटन क्षेत्राला मोठा फटका बसला होता.

१५ नंतर कॅन्टर बुकिंग ऑनलाईन
अभयारण्यात फिरण्यासाठी पर्यटकांची ओपन बसप्रमाणे असलेल्या कॅन्टरला पसंती असते. वेळेवर येणाऱ्या पर्यटकांना गैरसोय होऊ नये म्हणून कॅन्टरचे गेटवर बुकिंग करण्यात येत होते. मात्र वन विभागाच्या कर्मचाऱ्यांमार्फत कॅन्टर फुल्ल असल्याचे सांगून घोळ होत होता. त्यामुळे येत्या १५ ऑक्टोबरपासून कॅन्टर बुकिंग ऑनलाईन करण्यात येत असल्याचे वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.

ताडोबाशी जुळलेल्या गाईड, जिप्सीचालक, रिसॉर्ट मालक अशा शेकडो लोकांसाठी कोरोना काळातील पाचसहा महिने अत्यंत कठीण गेले होते. पर्यटन सुरू झाल्याने मोठा दिलासा मिळाला आहे. पहिल्या आठवड्यात उत्साह होता. आता गर्दी ओसरली आहे पण पुढे स्थिती सुधारेल, अशी आशा आहे.
- निखिल अभ्यंकर, रिसॉर्ट चालक

 

Web Title: Sanctuaries, tourist destinations waiting for tourists; Tadoba at 50-60 percent

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.