‘समृध्दी एक्सप्रेस’साठी आता पाचपट मोबदला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 29, 2017 20:16 IST2017-11-29T20:04:32+5:302017-11-29T20:16:43+5:30
विशेष नियोजन प्राधिकरणांतर्गत अधिग्रहीत केलेल्या अथवा थेट खरेदी केलेल्या जमिनीच्या बाबतीत बाजारमूल्य ठरवताना घटक दोन अधिसूचित करण्यात आल्यामुळे समृध्दी महामार्गासाठी हिंगणा तालुक्यातील अधिग्रहीत केलेल्या जमिनीचा मोबदला पाचपट मिळणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी सचिन कुर्वे यांनी दिली.

‘समृध्दी एक्सप्रेस’साठी आता पाचपट मोबदला
आॅनलाईन लोकमत
नागपूर : विशेष नियोजन प्राधिकरणांतर्गत अधिग्रहीत केलेल्या अथवा थेट खरेदी केलेल्या जमिनीच्या बाबतीत बाजारमूल्य ठरवताना घटक दोन अधिसूचित करण्यात आल्यामुळे समृध्दी महामार्गासाठी हिंगणा तालुक्यातील अधिग्रहीत केलेल्या जमिनीचा मोबदला पाचपट मिळणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी सचिन कुर्वे यांनी दिली.
विशेष नियोजन प्राधिकरणांतर्गत जमिनीचे भूसंपादनासंदर्भात महसूल व वन विभागाच्या अधिसूचनेनुसार हिंगणा तालुक्यातील महाराष्ट्र समृध्दी महामार्गासाठी संपादित केलेल्या जमिनीसंदर्भात मोबदला देताना गुणांक (घटक) एक वरुन दोन करण्यात आल्यामुळे अधिग्रहीत केलेल्या तथा थेट खरेदी केलेल्या जमिनीचा मोबदला आता पाचपट मिळणार आहे. यापूर्वी हा मोबदला अडीचपट मंजूर करण्यात आला होता. या नवीन निर्णयाचा लाभ नागपूरसह नाशिक व ठाणे जिल्ह्यातील शेतकऱ्यांनाही मिळणार आहे.
विशेष नियोजन प्राधिकरणांतर्गत कृषी क्षेत्रात समाविष्ट असलेल्या जमिनीच्या मोबदल्यात वाढ झाल्यामुळे हिंगणा तालुक्यातील २७८ शेतकऱ्यांना याचा प्रत्यक्ष लाभ होणार आहे. तालुक्यातील २०७ हेक्टर जमीन समृध्दी महामागार्साठी संपादित करण्यात येणार आहे. थेट जमीन खरेदीचा पाचपट भाव मिळत असल्यामुळे शेतकऱ्यांनीही आनंद व्यक्त केला असून समृध्दी महामागार्साठी जमीन संपादन करण्यास सहकार्य मिळत आहे.
समृध्दी महामागार्साठी हिंगणा तालुक्यातील यापूर्वी थेट खरेदी केलेल्या जमिनीचा मोबदला नवीन नियमाप्रमाणे वाढीव मिळणार आहे. वाढीव रक्कम लाभार्थी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात प्राधान्याने जमा करण्यात येईल, असेही जिल्हाधिकारी सचिन कुर्वे यांनी यावेळी सांगितले.