कोरोना संशयित रुग्णांना अन्यत्र हलविण्याची समीर मेघे यांची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 24, 2020 15:14 IST2020-04-24T15:13:50+5:302020-04-24T15:14:23+5:30
वानाडोंगरी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर शासकीय मुलींचे वसतीगृह येथील रुग्णांना तातडीने दुसरीकडे हलविले जावे, अशी मागणी घेऊन आमदार समीर मेघे यांनी जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेतली व त्यांना निवेदन दिले.

कोरोना संशयित रुग्णांना अन्यत्र हलविण्याची समीर मेघे यांची मागणी
जिल्हाधिकाऱ्यांना दिले निवेदन
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर: उपराजधानीतील कोरोना संशयितांना विविध ठिकाणी ठेवले जात आहे. वानाडोंगरी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर शासकीय मुलींचे वसतीगृह हेही एक ठिकाण आहे. या ठिकाणाजवळ दाट लोकवस्ती व पाण्याची ठिकाणे असल्याकारणाने येथील रुग्णांना तातडीने दुसरीकडे हलविले जावे, अशी मागणी घेऊन आमदार समीर मेघे यांनी जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेतली व त्यांना निवेदन दिले.
वानाडोंगरी याभागात ५० हजाराहून अधिक लोकवस्ती आहे. येथे कारखान्यात काम करणारे कामगार, व्यावसायिक, मोलमजुरी करणारे राहतात. ही वसाहत दाट लोकवस्तीची आहे. ज्या ठिकाणी कोरोना संशयितांना ठेवले आहे, त्या इमारतीलगतच शहराला पाणी पुरवठा करणारी विहीर आहे. तसेच तेथे पुरेशी स्वच्छतागृहे नाहीत. तसेच दुसºया बाजूला कचरा विलगीकरणाचा डंपिंग यार्ड आहे. या ठिकाणी जर कोरोना संशयित राहिले तर त्याचा धोका येथील नागरिकांना होऊ शकतो. येथील नागरिकही या संशयितांच्या वास्तव्यामुळे भयभीत झालेले आहेत. त्यामुळे या रुग्णांना दुसरीकडे स्थलांतरित करावे अशी मागणी केलेले निवेदन त्यांनी जिल्हाधिकाºयांकडे सोपविले. यावेळी त्यांच्या समवेत राजू हरडे, वर्षाताई शहाकार , अध्यक्ष वानाडोंगरी नगरपरिषद, कैलास गिरी आदी उपस्थित होते.