नागपुरात २२ पर्यंत आहेत तेच आदेश कायम : मनपा आयुक्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 19, 2020 09:50 PM2020-05-19T21:50:26+5:302020-05-19T22:05:05+5:30

शहरातील नागरिक व दुकानदार संभ्रमात आहेत. लॉकडाऊनमधून पूर्णपणे मुक्तता मिळालेली नाही. नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये. नागपूर अजूनही रेड झोनमध्येच असून २२ मेपर्यंत आहेत तेच आदेश लागू राहणार असल्याची माहिती महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी मंगळवारी दिली.

The same orders are up to 22 in Nagpur: Permanent Municipal Commissioner | नागपुरात २२ पर्यंत आहेत तेच आदेश कायम : मनपा आयुक्त

नागपुरात २२ पर्यंत आहेत तेच आदेश कायम : मनपा आयुक्त

Next
ठळक मुद्देसध्या नागपूर रेड झोनमध्येच

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : शहरातील नागरिक व दुकानदार संभ्रमात आहेत. लॉकडाऊनमधून पूर्णपणे मुक्तता मिळालेली नाही. नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये. नागपूर अजूनही रेड झोनमध्येच असून २२ मेपर्यंत आहेत तेच आदेश लागू राहणार असल्याची माहिती महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी मंगळवारी दिली.
महाराष्ट्र शासनातर्फे लॉकडाऊनमध्ये शिथिलता संबंधीचे नवीन आदेश मंगळवारी निर्गमित करण्यात आले आहेत. हे आदेश राज्यात २२ मेपासून अमलात येणार आहेत. त्यामुळे सध्यातरी नागपूर रेड झोनमध्ये आहे. मागील चार ते पाच दिवसात शहरात तीन कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांचा मृत्यू झाला आहे. शहरात अजूनही अनेक हॉटस्पॉट आहेत. त्यामुळे राज्य शासनाने १९ मे रोजी निर्गमित केलेल्या आदेशामध्ये रेड झोनमधून नागपूरचे नाव वगळले असले तरी शहरातील स्थिती पाहता अजूनही कोरोनाचा धोका टळलेला नाही.
मनपाच्या १७ मे रोजीच्या आदेशात कोणतेही बदल करण्यात आले नाहीत. त्यामुळे २२ मेपर्यंत जुनेच आदेश लागू राहणार आहेत, नवीन आदेश २२ मे रोजी शहरातील परिस्थिती पाहून निर्गमित करण्यात येईल. शहराला कायमस्वरूपी रेड झोनमधून बाहेर काढण्यासाठी सध्या आहे त्या आदेशाचे सर्वांनी पालन करणे आवश्यक आहे. आदेशाचे उल्लंघन केल्यास कायद्यानुसार कारवाई केली जाईल. त्यामुळे परवानगी दिलेल्या बाबींव्यतिरिक्त कुणीही घराबाहेर पडू नये, असे आवाहन मुंढे यांनी केले आहे.
१७ मे रोजी दिलेल्या आदेशानुसार नागपूर महापालिकेने घरपोच मद्यविक्री, नागरी क्षेत्रातील बांधकाम जेथे कामगार निवासी राहतील, तेथे बांधकाम सुरू करता येईल. आयटी कार्यासाठी आवश्यक हार्डवेअर आणि पॅकेजिंग साहित्याचे उत्पादन, इलेक्ट्रिक सामग्रीची दुकाने, हार्डवेअर आणि बिल्डिंग मटेरिअल, संगणक, मोबाईल, होम अम्प्लायन्सेस दुरुस्ती, (केवळ सोमवार, बुधवार, शुक्रवार), आॅटो स्पेअर्स आणि रिपेअर शॉप, टायर शॉप, आॅईल आणि लुब्रिकेन्ट्स शॉप (मंगळवार, गुरुवार, शनिवार आणि रविवार), आॅप्टिकल, स्टेशनरी आणि होजियरी शॉप (मंगळवार, गुरुवार, शनिवार, रविवार) अशाप्रकारे सुरू राहतील. ई-कॉमर्स (जीवनावश्यक वस्तू, औषधी आणि उपकरण), खासगी कार्यालये १५ टक्के उपस्थितीत, सर्व शासकीय कार्यालय ३३ टक्के उपस्थितीत सुरू करता येतील. याव्यतिरिक्त, मान्सूनपूर्व सर्व कामे सुरू करता येतील. प्रतिबंधित क्षेत्रात हा आदेश लागू राहणार नाही. केवळ तेथे जीवनावश्यक वस्तूंची दुकाने सकाळी ७ ते दुपारी ३ या वेळेत सुरू असतील. प्रतिबंधित क्षेत्राव्यतिरिक्त अन्य ठिकाणी जीवनावश्यक वस्तूंव्यतिरिक्त ज्या बाबींना परवानगी देण्यात आली आहे ती प्रतिष्ठाने सकाळी ७ ते रात्री ७ या वेळेत सुरु राहतील.

वाहतुकीला परवानगी नाही
जिल्हाअंतर्गत आणि जिल्ह्याबाहेरील प्रवासी वाहतूक, नागरी क्षेत्रातील उद्योग, कॅब आणि टॅक्सी सेवा, थिएटर, मॉल, जलतरण हौद, जिम आदींना मात्र परवानगी राहणार नाही.

Web Title: The same orders are up to 22 in Nagpur: Permanent Municipal Commissioner

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.