निर्बंध झुगारून आजपासून सलून दुकाने उघडणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 1, 2021 21:32 IST2021-06-01T21:30:48+5:302021-06-01T21:32:12+5:30
salon shops शासनाचे निर्बंध झुगारून बुधवारपासून नागपूर शहरातील आणि जिल्ह्यातील सलून दुकाने उघडण्याचा एकमुखी निर्णय नाभिक समाजातील सर्व संघटनांच्या बैठकीत मंगळवारी सायंकाळी घेण्यात आला.

निर्बंध झुगारून आजपासून सलून दुकाने उघडणार
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : शासनाचे निर्बंध झुगारून बुधवारपासून नागपूर शहरातील आणि जिल्ह्यातील सलून दुकाने उघडण्याचा एकमुखी निर्णय नाभिक समाजातील सर्व संघटनांच्या बैठकीत मंगळवारी सायंकाळी घेण्यात आला.
संत नगाजी महाराज मठामध्ये ही बैठक सर्व संघटनांच्या पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत पार पडली. मागील लॉकडाऊनमध्ये आणि आताही सलून व्यावसायिकांचे प्रचंड हाल झाले. सरकारने कसलीही मदत केली नाही. नाशिकमध्ये संक्रमणाचा दर ८.८१ असताना तेथील पालकमंत्र्यांनी सलून व्यवसायाला परवानगी दिली. नागपुरात त्यापेक्षा कमी ७.३६ असा दर असतानाही परवानगी का नाही, असा प्रश्न उपस्थित करण्यात आला. अन्य व्यवसायाला परवानगी देऊन सलून व्यवसायावर निर्बंध घातले. आता जगण्याचा प्रश्न निर्माण झाल्याने सकाळी ७ ते दुपारी २ या वेळात सलून दुकाने उघडण्याचा निर्णय घेण्यात आला. प्रशासनाचे कर्मचारी आल्यास दंड न भरता कारवाईला सामोरे जाण्याचा, प्रसंगी सामूहिक विरोध करण्याचा निर्णय यावेळी झाला. बैठकीला महाराष्ट्र नाभिक महामंडळ उपाध्यक्ष बंडू राऊत, महाराष्ट्र नाभिक महामंडळ पूर्व विदर्भ अध्यक्ष श्याम आस्करकर, महाराष्ट्र नाभिक महामंडळाचे जिल्हाध्यक्ष सतीश तलवारकर, कार्याध्यक्ष श्याम चौधरी, नाभिक एकता मंच संस्थापक-अध्यक्ष धनराज वलुकार, ग्रामीण जिल्हा उपाध्यक्ष विशाल वाटकर, महाराष्ट्र नाभिक महामंडळाचे जिल्हाध्यक्ष गणपत चौधरी, नाभिक युवा शक्ती शहर अध्यक्ष गुलाब इंगळे आदी उपस्थित होते.