नागपुरात विनापरवाना औषधांची विक्री : मेडिकलमधील डॉक्टरच्या क्लिनिकवर धाड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 26, 2018 21:08 IST2018-11-26T21:07:59+5:302018-11-26T21:08:35+5:30
विनापरवाना औषधांची विक्री करणाऱ्या एका डॉक्टरच्या क्लिनिकवर अन्न व औषध प्रशासनाच्या चमूने धाड टाकून १२ हजार रुपये किमतीचा साठा जप्त केला. पुढील कारवाईसाठी औषधांचे नमुने घेऊन प्रयोगशाळेत पाठविण्यात आले आहेत. विशेष म्हणजे, संबंधित डॉक्टर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या (मेडिकल) मानसोपचार विभागाचे विभागप्रमुख आहेत.

नागपुरात विनापरवाना औषधांची विक्री : मेडिकलमधील डॉक्टरच्या क्लिनिकवर धाड
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : विनापरवाना औषधांची विक्री करणाऱ्या एका डॉक्टरच्या क्लिनिकवर अन्न व औषध प्रशासनाच्या चमूने धाड टाकून १२ हजार रुपये किमतीचा साठा जप्त केला. पुढील कारवाईसाठी औषधांचे नमुने घेऊन प्रयोगशाळेत पाठविण्यात आले आहेत. विशेष म्हणजे, संबंधित डॉक्टर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या (मेडिकल) मानसोपचार विभागाचे विभागप्रमुख आहेत.
प्राप्त माहितीनुसार, चंद्रपूर जिल्ह्यातील भद्रावती येथे डॉ. प्रशांत टिपले यांचे ‘ईशा मार्इंड केअर’ नावाचे क्लिनिक आहे. मेडिकलच्या मानसोपचार विभागाचे प्रमुख म्हणून काम पाहून रविवारी व सुटीच्या दिवशी ते क्लिनिक चालवितात. डॉ. टिपले विनापरवाना रुग्णांना औषधांची विक्री करीत असल्याची तक्रार अन्न व औषध प्रशासनाकडे (एफडीए) होती. रविवारी एका रुग्णाची तपासणी करून त्याला क्लिनिकमधील औषधांची विक्री करीत असताना अन्न व औषध प्रशासनाच्या (एफडीए) चमूने त्यांना पकडले. त्यांच्याकडे असलेल्या मनोविकाराच्या सर्व औषधी सील केल्या. साधारण १२ हजारांच्या या औषधी असल्याचे सांगण्यात येते. सोबतच ११ बिलबुक जप्त करण्यात आले. पकडलेल्या सर्व औषधांचे नमुने प्रयोगशाळेत पाठविण्यात आले आहे. नमुन्यांचा अहवाल आल्यानंतर पुढील कारवाई करण्यात येईल, असे ‘एफडीए’चे म्हणणे आहे. ही कारवाई अन्न व औषधी प्रशासनाचे सहआयुक्त (औषधी) चंद्रपूरचे श्रीकांत फुले व नागपूरचे सहआयुक्त पी.एम.बल्लाळ यांनी केली.
तपासणी मोहीम सुरूच राहणार
विनापरवाना औषधांची विक्री करणे गुन्हा आहे. परंतु काही डॉक्टर व औषध विक्रेते विनापरवाना विक्री करीत असल्याच्या तक्रारी आहेत. त्यानुसार तपासणी व कारवाईची मोहीम हाती घेण्यात आली आहे. ही मोहीम सुरूच राहणार आहे.
डॉ. राकेश तिरपुडे
अन्न व औषधी प्रशासनाचे सहआयुक्त (औषधी)