बँकेत गहाण असलेल्या सदनिकेची विक्री :१७ लाख हडपले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 10, 2019 00:47 IST2019-02-10T00:46:29+5:302019-02-10T00:47:47+5:30
बँकेत गहाण ठेवलेल्या सदनिकेच्या विक्रीचा करारनामा करून एका दाम्पत्याने १७ लाख रुपये हडपले. ही बनवाबनवी उघड झाल्यानंतर लकडगंज पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला.

बँकेत गहाण असलेल्या सदनिकेची विक्री :१७ लाख हडपले
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : बँकेत गहाण ठेवलेल्या सदनिकेच्या विक्रीचा करारनामा करून एका दाम्पत्याने १७ लाख रुपये हडपले. ही बनवाबनवी उघड झाल्यानंतर लकडगंज पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला.
साईशक्ती अपार्टमेंट, छापरूनगर रहिवासी गोविंद नत्थूमल सजनानी (वय ४४) असे तक्रारकर्त्यांचे नाव आहे. तर, अशोक पितांबर क्रिशनानी (वय ४९) आणि निकिता अशोक क्रिशनानी (४३) अशी आरोपींची नावे आहेत. सजनानी आणि क्रिशनानी दाम्पत्य एकाच अपार्टमेंटमध्ये राहतात. नोव्हेंबर २०१७ ला क्रिशनानी दाम्पत्याने त्यांची सदनिका विक्रीस काढली. सजनानीने ती ४० लाख, २१ हजारात विकत घेण्याचा करार केला. त्यानुसार, सजनानीने क्रिशनानीला १ लाख, २१ हजार रोख आणि १६ लाख रुपयांचा धनादेश दिला. अशा प्रकारे १७ लाख रुपये घेतल्यानंतर क्रिशनानीने विक्रीपत्र करून देण्यासाठी टाळाटाळ चालवली. परिणामी सजनानी यांनी त्याला नोटीस पाठवली. त्यालाही प्रतिसाद मिळत नसल्याचे पाहून सजनानी यांनी चौकशी केली असता ज्या सदनिकेची विक्री करून देण्याचा करार क्रिशनानी दाम्पत्याने केला. ती बँकेत गहाण असल्याचे उघड झाले. क्रिशनानीने आपली फसवणूक केल्याचे लक्षात आल्याने सजनानींनी लकडगंज ठाण्यात तक्रार नोंदवली. पोलिसांनी फसवणुकीच्या आरोपाखाली क्रिशनानी दाम्पत्याविरुद्ध गुन्हा दाखल केला. पुढील तपास सुरू आहे.