एलेक्सिस प्रकरणात साहिलला जामीन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 5, 2020 00:46 IST2020-08-05T00:44:47+5:302020-08-05T00:46:01+5:30
इस्पितळ प्रशासनावर उलटसुलट आरोप लावून एलेक्सिस हॉस्पिटलमध्ये गोंधळ घालणाऱ्या कुख्यात साहिल सय्यद याला न्यायालयाने आज जामीन मंजूर केला.

एलेक्सिस प्रकरणात साहिलला जामीन
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : इस्पितळ प्रशासनावर उलटसुलट आरोप लावून एलेक्सिस हॉस्पिटलमध्ये गोंधळ घालणाऱ्या कुख्यात साहिल सय्यद याला न्यायालयाने आज जामीन मंजूर केला. दरम्यान, त्याच्याविरुद्ध दाखल असलेल्या गुन्ह्याची पार्श्वभूमी लक्षात घेता त्याला कारागृहात पाठविण्यात आले. दुसरीकडे याच गुन्ह्यात-आरोपी असलेली साहिलची पत्नी नीलिमा जयस्वाल-तिवारी हिला बुधवारी पोलीस ताब्यात घेण्याची शक्यता आहे.
वेगवेगळ्या नेत्यांसोबतचे फोटो स्वत:च सोशल मीडियावर व्हायरल करून गुन्हेगारीत सक्रिय असलेला कुख्यात साहिल सय्यद याची हनी ट्रॅपच्या कटाची आॅडिओ क्लिप व्हायरल झाल्यामुळे पोलिसांनी साहिल विरुद्ध कारवाईचा पाश आवळला. या पार्श्वभूमीवर, साहिलविरुद्ध मानकापूर पोलीस ठाण्यात दोन, तर पाचपावली, बजाजनगर, तहसील आणि नंदनवन पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले. त्यातील मानकापूरच्या एलेक्सिसच्या गुन्ह्यात सोमवारी सायंकाळी गुन्हे शाखेचे उपनिरीक्षक मयूर चौरसिया यांनी साहिलला अटक केली. त्याला मंगळवारी न्यायालयात हजर करून त्याचा चार दिवसाचा पीसीआर मागण्यात आला. मात्र न्यायालयाने तो नामंजूर करून त्याला न्यायालयीन कोठडीत पाठवण्याचे आदेश दिले. त्यामुळे त्याच्या वकिलांनी लगेच त्याचा जामीन अर्ज न्यायालयात ठेवला. त्यानुसार त्याला या गुन्ह्यात जामीन मंजूर करण्यात आला दरम्यान, त्याच्यावर दाखल असलेल्या अन्य गुन्ह्याची पार्श्वभूमी लक्षात घेता त्याला कारागृहात पाठवण्यात आले. आता त्याला तहसीलमध्ये दाखल असलेल्या गुन्ह्यात अटक केली जाणार आहे. महापौर संदीप जोशी आणि नगरसेवक दयाशंकर तिवारी यांना हनी ट्रॅपमध्ये फसविण्याचे कटकारस्थान रचल्याचा त्याच्यावर आरोप आहे. या गुन्ह्याच्या चौकशीची तयारी पोलिसांनी करून ठेवली आहे.
व्हाईस सॅम्पल घेतले
चौकशी दरम्यान पोलिसांनी साहिलचे व्हॉईस सॅम्पल (आवाजाचे नमुने) घेतले असून ते फॉरेन्सिकला पाठविण्यात आले आहे.
नीलिमाला बुधवारी अटक करणार?
एलेक्सिस प्रकरणात आरोपी असलेली साहिलची पत्नी नीलिमा जयस्वाल-तिवारी हिला बुधवारी अटक होण्याची शक्यता आहे. सध्या ती कारागृहात आहे.