मनपा रुग्णालयात रुग्णांची सुरक्षा वाऱ्यावर()

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 04:16 IST2021-01-13T04:16:50+5:302021-01-13T04:16:50+5:30

रुग्णांचा जीव धोक्यात : इंदिरा गांधी रुग्णालयात यंत्रणेचा अभाव : फायर ऑडिटनंतरही उपाययोजना नाही लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : ...

Safety of patients in Municipal Hospital is in jeopardy () | मनपा रुग्णालयात रुग्णांची सुरक्षा वाऱ्यावर()

मनपा रुग्णालयात रुग्णांची सुरक्षा वाऱ्यावर()

रुग्णांचा जीव धोक्यात : इंदिरा गांधी रुग्णालयात यंत्रणेचा अभाव : फायर ऑडिटनंतरही उपाययोजना नाही

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : भंडारा जिल्ह्यातील जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या अतिदक्षता नवजात शिशू केअर युनिटमध्ये लागलेल्या आगीत दहा बालकांचा मृत्यू झाला़ या घटनेनंतर आता नागपूरसह राज्यातील रुग्णालयांतील सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. विशेष म्हणजे महापालिकेच्या रुग्णालयांची पाहणी केली असता इंदिरा गांधी रुग्णालय (गांधीनगर), पाचपावली आणि आयसोलेशन रुग्णालयामध्ये फायर सुरक्षात्मक यंत्रणा नसल्याची धक्कादायक बाब पुढे आली आहे.

इंदिरा गांधी रुग्णालयाची इमारत तीन मजली आहे. १५० बेड क्षमतेच्या या रुग्णालयात अतिदक्षता विभाग, व्हेंटिलेटरसह अशा आवश्यक सुविधा उपलब्ध करण्यात आल्या आहे. परंतु या रुग्णालयात सुरक्षेच्या दृष्टीने फायर इक्विपमेंट बसविण्यात आलेले नाहीत. विशेष म्हणजे महापालिकेच्या अग्निशमन विभागाने ऑडिट केल्यानंतरही उपाययोजना करण्यात आलेल्या नाहीत. पाण्याची टाकी, हायड्रन्ट, पम्प हाऊस, स्प्रिंकलर, फायर अलार्म, स्मोक डिटेक्टर अशी कुठल्याही प्रकारची व्यवस्था नसल्याचे निदशंनास आले.

अशीच अवस्था पाचपावली सूतिकागृहाची आहे. येथे उत्तर व पूर्व नागपुरातील महिला प्रसूतीसाठी येतात. सूतिकागृहाची इमारत बहुमजली नसली तरी सुरक्षेच्या दृष्टीने आवश्यक असलेल्या उपाययोजना करण्याची गरज आहे. अशीच अवस्था आयसोलेशन रुग्णालयाची आहे. या रुग्णालयाची इमारत जुनी असून येथे आग नियंत्रणाची सक्षम यंत्रणा नाही. दुर्दैवाने आगीची घटना घडल्यास याला जबाबदार कोण, असा प्रश्न निर्माण झाला आहे.

....

मनपा इमारतींतही उपाययोजना नाही

नागपूर महापालिकेच्या वतीने व्यापारी इमारती, अन्य इमारती तसेच मोठे मॉल, सिनेमागृहे आदींना फायर ऑडिट करण्याचे तसेच येथे फायर उपकरणे बसविण्यासंदर्भात सांगण्यात येते़ ही उपकरणे नसल्यास अशा इमारतधारकांवर कारवाई करण्यात येते. परंतु, महापालिकेच्या रुग्णालयांसह शासकीय इमारतीमध्येही कुठल्याही प्रकारची अग्निशामक उपकरणे लावण्यात आलेली नसल्याचे दिसून येते़

....

आग नियंत्रणासाठी आवश्यक असलेली यंत्रणा

-रुग्णालयाच्या बांधकामानुसार पाण्याची व्यवस्था(टाकी)

- वीज नसल्यास पाणीपुरवठ्यासाठी पंप

- वेळप्रसंगी बाहेर पडण्यासाठी पर्यायी मार्ग

-अग्निशामक उपकरण

-हायड्रन्ट व्यवस्था

-स्मोक डिटेक्टर

-फायर अलार्म

-पम्प हाऊस

-स्प्रिंकलर

.....

५६१ पैकी २०० रुग्णालयांनी केली पूर्तता

नागपूर शहरातील ५६१ रुग्णालयांपैकी २०० रुग्णालयांनी आग नियंत्रण यंत्रणा बसविली आहे. परिपूर्तता प्रमाणपत्र न घेतलेल्या उर्वरित रुग्णालयांंचे वेळोवेळी ऑडिट करून पूर्तता करण्यासंदर्भात नोटीस बजावल्या जातात. परंतु काही रुग्णालये जुन्या इमारतीत आहेत. अशा इमारतीत आवश्यक असलेली यंत्रणा उभारणे शक्य नाही. त्यामुळे शंभर टक्के पूर्तता होणे शक्य नाही.

राजेंद्र उचके, मुख्य अग्निशमन अधिकारी, मनपा

Web Title: Safety of patients in Municipal Hospital is in jeopardy ()

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.