मॉलमध्ये सुरक्षेचा गोलमाल

By Admin | Updated: December 21, 2014 00:18 IST2014-12-21T00:18:49+5:302014-12-21T00:18:49+5:30

सिडनी आणि पेशावरमधील दहशतवादी हल्ल्याने कटाच्या दोन नव्या कल्पना सुरक्षा यंत्रणांच्या ध्यानात आणून दिलेल्या आहेत. देशाचे हृदयस्थळ असलेली उपराजधानी दहशतवाद्यांच्या हिटलिस्टवर आहे.

Safety breakthrough in malls | मॉलमध्ये सुरक्षेचा गोलमाल

मॉलमध्ये सुरक्षेचा गोलमाल

उपराजधानी किती सुरक्षित ?
नागपूर : सिडनी आणि पेशावरमधील दहशतवादी हल्ल्याने कटाच्या दोन नव्या कल्पना सुरक्षा यंत्रणांच्या ध्यानात आणून दिलेल्या आहेत. देशाचे हृदयस्थळ असलेली उपराजधानी दहशतवाद्यांच्या हिटलिस्टवर आहे. त्यामुळे स्थानिक पोलिसांनी हॉटेल, मॉल, मल्टिप्लेक्स, शाळा महाविद्यालये आणि अन्य संस्था- प्रशासनाला सतर्कतेचे आदेश दिले आहेत. योग्य खबरदारी घ्या, सुरक्षेच्या प्रभावी उपाययोजना करा, असे पोलीस अधिकारी वारंवार सांगतात. मात्र, बहुतांश संस्था, प्रतिष्ठानांचे प्रशासन त्याकडे गांभीर्याने लक्ष द्यायला तयार नाही. मॉल आणि मल्टिप्लेक्समधील सुरक्षा व्यवस्था गोलमाल असल्याचे जाणवते.
गोळीबार किंवा स्फोटाच्या घटनेचा आवाज जगभरात पोहचावा, असे दहशतवाद्यांचे मनसुबे असतात. त्यासाठी दहशतवादी ‘कम बे बम’ ची नीती अवलंबतात. गर्दीच्या ठिकाणांसोबतच जेथे विदेशी पर्यटकांची वर्दळ राहाते, त्या ठिकाणांना ते टार्गेट करतात.
नागपुरात अनेक मॉल मल्टिप्लेक्स आहे. एकट्या सीताबर्डीतच तीन मॉल आहेत. एकीकडे सीताबर्डीच्या बाजारात सर्वसामान्यांची रोज झुंबड असते. दुसरीकडे खरेदीसोबतच मनोरंजनाचीही (चित्रपटगृह) सुविधा उपलब्ध असल्यामुळे बड्या घरची मंडळीसाठी मॉलला प्राधान्य देतात. येथे विदेशी पर्यटकांचीही ये - जा असते. दहशतवादी ज्या पध्दतीने ओलीस ठेवण्यासाठी ठिकाण शोधतात, त्यातील मॉलही एक असू शकते. नागपूरच्या मॉलमधील सुरक्षा व्यवस्था म्हणजे, तेथील मुख्य प्रवेशद्वारावर लावलेले मेटल डिटेक्टर. त्यातून आत जाणारा व्यक्ती घातपाती साहित्य किंवा स्फोटके आतमध्ये नेत असेल तर ते विशिष्ट आवाज (संकेत) करते. यासोबतच एखादी लोखंडी वस्तू जरी खिशात असली तरी डिटेक्टर तशा प्रकारचा संकेत देते.
त्यामुळे या ठिकाणी असलेले सुरक्षा रक्षक बरेचदा या संकेताकडे दुर्लक्ष करतात. केवळ नावापुरते असलेले हे सुरक्षा रक्षक अनेकदा मोबाईलच्या चॅटिंगमध्ये व्यस्त असल्याचेही पहायला मिळते. (प्रतिनिधी)
अधोरेखित मुद्दा
आतापर्यंतच्या ठिकठिकाणच्या घातपाताच्या घटनांमध्ये एक मुद्दा विविध ठिकाणच्या तपास यंत्रणांनी अधोरेखित केला. तो म्हणजे, दहशतवादी अशा ठिकाणांची घातपातासाठी निवड करतात, जेथे विदेशी पर्यटकांची वर्दळ असते. कारण स्फोट किंवा गोळीबार एकाच ठिकाणी होत असला तरी त्याच्या किंकाळ्या वेगवेगळ्या देशाला हादरवतात. कुण्या एखाद्या खेड्यात दहशतवाद्यांनी स्फोट घडविला तर देशविदेशात दहशत निर्माण करणाऱ्यांचे त्यांचे कलुषित मनसुबे यशस्वी होणार नाही, यांची त्यांना कल्पना असते.
पार्किंगमध्येही धोका
अनेक मॉल-मल्टिप्लेक्समधील पार्किंगची व्यवस्था धोकादायक आहे. तेथे ठेवल्या जाणाऱ्या वाहनांमध्ये काय ठेवले आहे, ते शोधणारे उपकरण बरेच ठिकाणी नाही. वाहनधारकाकडून शुल्क वसूल करण्यातच पार्किंगवाल्यांना स्वारस्य असते. त्याच्या वाहनात काय आहे, त्या वाहनचालकाचे नाव, गाव काय आहे, त्याच्याकडे वाहन परवाना आहे किंवा नाही ते विचारण्याची किंवा त्याची नोंद करण्याची तसदी बऱ्याच पार्किंगच्या ठिकाणी घेतली जात नाही. त्यामुळे पार्किंगमध्ये घातपाताचा धोका जास्त असतो.

Web Title: Safety breakthrough in malls

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.