In the rural areas of Nagpur, schools rejected tobacco exemption | नागपूर  ग्रामीण भागांमध्ये शाळांनी नाकारली तंबाखूमुक्ती

नागपूर  ग्रामीण भागांमध्ये शाळांनी नाकारली तंबाखूमुक्ती

ठळक मुद्देतंबाखूमुक्त अभियानात केवळ १७ शाळा पास : सलाम फाऊंडेशनच्या अहवालातून उघड

लोकमत  न्यूज  नेटवर्क 
नागपूर : ग्रामीण भागांमध्ये शालेय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना मोठ्या प्रमाणात गुटखा, खर्रा, तंबाखूचे व्यसन जडलेले असल्याचे वास्तव आहे. त्यामुळे शासनाने शाळेमधून तंबाखूमुक्त करण्यासाठी अभियान राबविले आहे. या अभियानात नागपूर जिल्हा परिषदेच्या १५३६ शाळांपैकी १७ सहभागी झाल्या आहेत. ही बाब सलाम मुंबई फाऊंडेशनच्या एका अहवालातून उघड झाली आहे.
इंटरनॅशनल एजन्सी फॉर रिसर्च ऑन कॅन्सर आणि जागतिक आरोग्य संघटनेनुसार धूम्ररहित तंबाखू पदार्थात २८ कर्कजन्य रसायने असतात. कोणताही प्राणी तंबाखूची पाने खात नाही. सापही तंबाखूच्या शेतात जात नाही. तरीही सर्वात सूज्ञ समजला जाणारा मनुष्य तंबाखूचे सेवन करून स्वत:चेच जीवन नरकमय बनवत आहे. आज लहान मुलेसुद्धा तंबाखूच्या विळख्यात अडकली आहेत. शालेय विद्यार्थ्यांमध्ये तंबाखूचे सेवन कमी करण्यासाठी शासनातर्फे हे अभियान राबविण्यात येत आहे. त्याअंतर्गत नागपूर जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने जिल्ह्यातील १५३६ शाळा तंबाखूमुक्त मानस बाळगला होता. त्यासाठी शिक्षण विभागातील अधिकारी व कर्मचारीही प्रयत्नशील होते. यासाठी शासनाने ११ निकष ठेवले होते. शाळा तंबाखूमुक्त असल्याबाबतच्या ११ निकषाची माहिती शाळांना आॅनलाईन सलाम मुंबई फाऊंडेशनच्या अ‍ॅपवर नोंदवायची होतीे. आतापर्यंत जि.प.च्या १५३६ पैकी १७ शाळांनी तंबाखूमुक्ती साधली असल्याचे या अ‍ॅपवरील नोंदणीवरून दिसून येत आहे. असे असले तरी १४१९ शाळा अद्याप तंबाखूमुक्तीपासून दूर आहेत. १३९१ शाळांनी तर प्रयत्नही केलेले दिसत नाहीत.
 या निकषाची शाळांनी करायची होती अंमलबजावणी
शाळेजवळ फलक लावणे आवश्यक , शालेय परिसरात तंबाखू वापरास प्रतिबंध, तंबाखू नियंत्रण समितीची स्थापना, धूम्रपान व तंबाखूचा वापर करणे हा गुन्हा असल्याचा फलक शाळा परिसरात लावणे, शाळेत तंबाखूचे दुष्परिणाम आणि तंबाखू नियंत्रण कायद्याबाबत पोस्टर्स लावणे, तंबाखू विरोधी संदेश शालेय साहित्यांवर चिटकवणे, तंबाखू विरोधी २००३ कायद्याची एक प्रत मुख्याध्यापकांकडे उपलब्ध असणे, शाळा तंबाखूमुक्त शाळा असल्याचा फलक प्रवेशद्वाराजवळ लावणे, तंबाखू नियंत्रण उपक्रमात सक्रिय विद्यार्थी, मुख्याध्यापकांचा सत्कार करणे, शाळेपासून १०० मीटर परिसरात तंबाखू विक्री व उत्पादनावर बंदी, शाळेच्या नियमित आरोग्य उपक्रमांमध्ये तंबाखू नियंत्रणाचा समावेश आदी.

Web Title: In the rural areas of Nagpur, schools rejected tobacco exemption

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.