मुद्रांक शुल्कासाठी धावपळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 10, 2017 00:37 IST2017-10-10T00:36:54+5:302017-10-10T00:37:15+5:30
राज्यात प्रचलित मुद्रांक विक्री व्यवस्था सुरू ठेवून मुद्रांक विक्रेत्यांना १० टक्के मनौती (कमिशन) मिळावे, .....

मुद्रांक शुल्कासाठी धावपळ
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : राज्यात प्रचलित मुद्रांक विक्री व्यवस्था सुरू ठेवून मुद्रांक विक्रेत्यांना १० टक्के मनौती (कमिशन) मिळावे, या प्रमुख मागणीसह आपल्या विविध मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी राज्यभरातील परवानाधारक मुद्रांक शुल्क विक्रेत्यांनी सोमवारपासून संप पुकारला आहे. दरम्यान प्रशासनाने हा संप मागे घेण्याबाबत प्रयत्न करून पाहिला मात्र ते निष्फळ ठरले. या संपामुळे नागरिकांना मुद्रांकासाठी धावपळ करावी लागली.
१० टक्के मनौतीसह राज्यात सुरू असलेली ई-चालान तसेच ई-एसबीटीआर ही प्रणाली अधिकृत मुद्रांक विक्रेते व दस्तलेखक यांनाच मिळावी, मृत पावलेल्या मुद्रांक विक्रेत्यांच्या वारसास परवाना मिळावा, या मागण्यांसाठी राज्यभरातील मुद्रांक शुल्क विक्रेत्यांनी बेमुदत संप पुकारला आहे. याच मागण्यांसाठी विदर्भातील परवानाधारक मुद्रांक शुल्क विक्रेत्यांनी काही दिवसांपूर्वीच संप पुकारला होता, हे विशेष.
या संपात नागपुरातील सर्व परवानाधारक मुद्र्रांक शुल्क विक्रेते सहभागी झाले आहेत. त्यामुळे सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयात शासकीय कामासाठी आलेल्या नागरिकांना मुद्रांक शुल्कासाठी धावपळ करावी लागली. अखेर संप असल्याचे माहिती झाल्यावर अनेकांना रिकाम्या हाताने घरी परत जावे लागले.
विदर्भ लायसन्सधारक मुद्रांक विक्रेता संघटनेच्या नेतृत्वात जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील तहसील कार्यालयासमोर परवानाधारक मुद्रांक विक्रेत्यांनी विक्री बंद ठेवून निदर्शने करीत शासनाचे लक्ष वेधले. संघटनेचे अध्यक्ष सतीश पाटील, ताराचंद्र शेळके, विजय क्षीरसागर, प्रभू नरडे, शोभा वंजारी, गणेश भोयर, संजय हरडे, भूषण बोकडे, नारायण मोहाडीकर, विजय खोकले, पी.पी. ठाकरे, रत्नमाला कावरे, तारा वारकर आदींसह सर्वच मुद्रांक शुल्क विक्रेते संपात सहभागी होते.
२५ लाखाचे नुकसान
दरम्यान, मुद्र्रांक शुल्क विक्रेत्यांच्या संपामुळे पहिल्या दिवशी जवळपास २५ लाखाचे नुकसान झाल्याचे सांगितले जाते. हा संप बेमुदत आहे तसेच राज्यव्यापी आहे. तेव्हा या त्यांच्या मागणयांबाबत गांभीर्याने विचार न केल्यास नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागू शकतो.