पेपरफुटीची शंका: प्रशासन सतर्क |
नागपूर : शुक्रवारी झालेल्या अभियांत्रिकीच्या मेकॅनिकल शाखेच्या आठव्या सत्राच्या 'कॅड'च्या पेपरदरम्यान अशा प्रकारचे 'रॅकेट' सुरू असल्यासंदर्भात शिक्कामोर्तबच झाले. अज्ञात व्यक्तीने काही विद्यार्थ्यांना विद्यापीठाचा पेपर असाच येणार अशी बतावणी करून ७ पानांचे 'प्रिंटआऊट' दिले. या 'प्रिंटआऊट्स'ची प्रत गुरुवारी 'लोकमत' कार्यालयापर्यंत पोहचविण्यात आली. अगदी काळपट असणार्या प्रतींवर तो नेमका कुठला पेपर आहे हे कापण्यात आले होते. शिवाय विद्यापीठाच्या प्रश्नपत्रिकांसारखी यात मांडणी करण्याचा प्रयत्न करण्यात आला होता, परंतु पूर्णपणे तसे करण्यात यश आलेले नव्हते. इंटरनेटवर पाहणी केली असता हा पेपर आठव्या सत्राचा असल्याचे लक्षात आले. खरोखरच हा शुक्रवारी येणारा पेपर आहे की नाही यासंबंधात संभ्रम असल्याने संबंधित प्रतिनिधीने लगेच याची माहिती विद्यापीठातील वरिष्ठ अधिकार्यांना दिली. यानंतर विद्यापीठाच्या अधिकार्यांचे धाबे दणाणले. दोन दिवसांअगोदरच अशाच प्रकारे 'मोबाईल कम्युनिकेशन'च्या पेपरमध्ये काय येणार याचे 'गेसिंग' अगोदरच विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचविण्यात आल्याचा दावा करण्यात आला होता. त्यामुळे कुठलाही धोका नको म्हणून मध्यरात्री विद्यापीठाचे अधिकारी सक्रिय झाले. रात्री १.३0 वाजता प्र-कुलगुरू डॉ. विनायक देशपांडे यांच्या निवासस्थानी तातडीची बैठक झाली. यात परीक्षा नियंत्रक विलास रामटेके, बीसीयूडी संचालक डॉ.कोमावार व अभियांत्रिकी शाखेचे अधिष्ठाता डॉ.रवींद्र क्षीरसागर यांचा समावेश होता. संबंधित पेपरची सखोल तपासणी झाल्यानंतर कोणीतरी जाणूनबुजून केलेला हा प्रकार असून विद्यापीठाचा पेपर अशाप्रकारे 'सेट' केलेला नसतो त्यामुळे ही पेपरफूूट नसल्याचे निष्कर्ष काढण्यात आला. तरीदेखील दक्षता म्हणून विद्यापीठाचे अधिकारी शुक्रवारी सकाळीच परीक्षा केंद्रांवर पोहोचले अन् प्रत्यक्ष पेपरमध्ये एखाद-दोन मुद्दे सोडले तर काहीच उतरले नसल्याने सर्वांचा जीव भांड्यात पडला. दरम्यान, संभाव्य धोका टाळण्यासाठी प्रशासनाने ऐनवेळी प्रश्नपत्रिका बदलल्या का, अशी चर्चादेखील विद्यापीठ वतरुळात सुरू होती. |