आरटीओच्या निरीक्षकाला जीवे मारण्याची धमकी
By Admin | Updated: January 17, 2015 02:39 IST2015-01-17T02:39:55+5:302015-01-17T02:39:55+5:30
राज्याच्या परिवहन विभागाचे आयुक्त महेश झगडे यांनी गुरुवारी प्रादेशिक परिवहन कार्यालयातून (आरटीओ) दलालांना हद्दपार करण्याचे आदेश दिले.

आरटीओच्या निरीक्षकाला जीवे मारण्याची धमकी
नागपूर : राज्याच्या परिवहन विभागाचे आयुक्त महेश झगडे यांनी गुरुवारी प्रादेशिक परिवहन कार्यालयातून (आरटीओ) दलालांना हद्दपार करण्याचे आदेश दिले. याला २४ तास होत नाही तोच दलालांकडून आरटीओच्या वाहन निरीक्षकाना धमक्या मिळणे सुरू झाले आहे. शुक्रवारी शहर आरटीओ कार्यालयात पक्क्या वाहन चाचणी परीक्षेत नापास केल्याच्या कारणावरून एका सहायक मोटार वाहन निरीक्षकाला जीवे मारण्याची धमकी दिली. या संदर्भात पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शुक्रवारी दुपारी १२.३० वाजता शहर आरटीओ कार्यालयाच्या परिसरात पूर्व उपप्रादेशिक परिवहन कार्यालयांतर्गत येणाऱ्या उमेदवारांची पक्क्या वाहन चाचणीची परीक्षा सुरू होती. वाहन चाचणी परीक्षेत वाहनचालकांकडून २४ नियमांचे पालन होणे आवश्यक आहे. नियम पाळणाऱ्यानाच पास करण्याचे कार्यालयाचे निर्देश आहे. त्यानुसार सहायक मोटार वाहन निरीक्षक मोहोड उमेदवारांची परीक्षा घेत होते, तो कुठे चुकत आहे त्याची नोंदही घेत होते. याचवेळी सोनू नावाचा दलाल आला. तुम्ही अनेक जणांना नापास करीत आहात, असे बोलून मोहोड यांच्याशी हुज्जत घालू लागला. त्याने पाहून घेण्याची धमकीही दिली. मोहोड यांनी या विषयी वरिष्ठांना माहिती दिली. सूचनेनुसार त्यांनी दुपारी सीताबर्डी पोलीस ठाण्यात संबंधित दलालाच्या विरोधात तक्रार दाखल केली. सायंकाळी ८ वाजताच्या सुमारास त्या दलालाने मोबाईलवरून जीवे मारण्याची धमकी दिली. या संदर्भात कार्यालयाकडून रात्री उशिरापर्यंत अंबाझरी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्याची तयारी सुरू होती.
या घटनेला घेऊन परिवहन आयुक्तांचे आदेशांचे कसे पालन करावे, असा प्रश्न आरटीओ अधिकाऱ्यांना पडला आहे. (प्रतिनिधी)